Blog on girls dispute

 ...खूपच प्रगती झाली !

 पुरुषांच्या तुलनेत सोशिक समजदार असलेल्या महिला पूर्वीच्या तुलनेत पुढे जाण्याच्या संधी असताना किंवा असला वाईट विचारही मनात आणू शकत नाहीत अशी ख्याती असताना व ज्यांची  निर्मिती दया, क्षमा, शांती व प्रेमासाठी झाली असताना त्या महिला  बदलत्या जमान्यात इतक्या क्रूरपणाचे प्रतिक का होऊ लागल्यात? हे जसे प्रश्न आहेत अगदी तसेच विचार करण्यासारखा मुद्दा हा ठरतो की, एखाद्या घटकाला सवलती दिल्या की सुधारणेबरोबरच तो शेफारूही शकतो आणि तसे होत असेल तर मग काय  करायचे? उत्तरही शक्य तितक्या लवकर शोधायला हवे. 

माजात समानता आणायची असेल  तर प्रत्येक घटकाला समान न्याय मिळणे आवश्यकअसते  आणि साऱ्यांच्या योगदानाशिवाय हे  शक्य नसल्याने विविध घटकांना जोखंडातून मुक्त करण्यासाठी चळवळी सुरु झाल्या या चळवळींना कायद्याने बळकटी आली.मात्र हे करताना त्यातून ज्या घटकांना बळकटी मिळाली त्यातील काही घटक माजुरडेपणा दाखवू लागलेत की काय, असा विचार करण्याची वेळ सध्या आलेली आहे.   नुकताच महिला दिन साजरा झाला. पुरुष प्रधान संस्कृतीने महिलांना स्वातंत्र्य  नव्हते असा एक काळ होता, आता त्यात पूर्ण सुधारणा झालेय असे नव्हे, कारण झोपडपट्टीतील महिला पहिल्यासारखेच आयुष्य जगत आहेत त्यांच्यापर्यंत कायदे किंवा सुधारणा पोचत नाहीत आणि आपल्या आयुष्याचे भोग म्हणत त्या रोज मळक्या पिशव्या खांद्यावर घेऊन बाटल्या गोळा करायला जात असतात. मुलगी शिकली आणि प्रगती झाली हे एक वाक्य इतके प्रचलित झालेय की  विचारूच नका,पण जेव्हा अशी एक बाजू असते तेव्हा त्याला दुसरे अनेक कंगोरेही असतात आणि ते वेळेत समाजासमोर मांडले जाणे आवश्यक आहे. असे कोणतेही क्षेत्र नाही की त्यात सडकेपणा  नाही. पण या सडकेपणाची कबुली द्यायचीच मनोवृत्ती लोप पावत असेल तर मग सुधारणेस जसा वाव उरात नाही अगदी तसाच निकोप समाजही निर्माण होणे कठीण होऊन बसते. 
सर्व क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताहेत ही अभिमानास्पद घटना आहे पण आज त्यावर येथे चर्चा करण्यात येणार नसून पुरुषांइतकाच महिलांमध्येही  विक्षिप्तपणा भरलेला आहे पण समाज त्याचा निषेध करताना दिसत नाही हा एक दखल घेण्यासारखा मुद्दा आहे. खुप मागे जाण्याची गरज नाही. लालबागमध्ये मुलीने आईची हत्या करून तिचे पाच तुकडे कपाटात ठेऊन दुर्गंधी येऊ नये म्हणून १०० परफ्युम वापरणे ही जशी गंभीर घटना अगदी  तसेच नाशिकमध्ये दहावीचा पेपर संपल्यावर भर रस्स्त्यात किरकोळ कारणावरून एकमेकींच्या झिंज्या उपटणाऱ्या पोरी, याकडे समाज किंवा कायदेशीर यंत्रणा कोणत्या नजरेने पाहतात  किंवा यातून काय धडा घ्यावा लागेल जेणेकरून भविष्यात अशा घटना वाढू नयेत हे पाहता येईल असा विचार होताना दिसत नाही. 
आता घेतलेली ही दोन उदाहरणे प्रातिनिधिक असून आणखी कितीतरी नकारात्मक घटना घडत आहेत, जेणेकरून पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया गुन्हेगारीत  दिसत आहेत.आपली संस्कृती पुरुषप्रधान असली तरी खूपशा बदनामीकारक शिव्या पुल्लिंगी आहेत हासुद्धा दखल घेण्यासारखा मुद्दा आहे. आता भविष्यात महिला आरोपींसाठी स्वतंत्र शिव्यांचा शब्दकोश तयार करावा लागणार असे दिसते. असो, यातील विनोदाचा मुद्दा बाजूला ठेऊन इतर मुद्दे लक्षात घ्यावे लागतील. राग आणि विकृती यांचा तसा जवळचा संबंध आहे. इतर कपटीपणा, लबाडी, स्वार्थीपणा, वैगेरे अवगुण मानवी स्वभावात सगळीकडे कमी अधिक फरकाने मुरलेले असतात. अमुकच घटकाचे नव्हे पण सध्या राग आणि विकृती या वाढताना दिसत आहेत. त्याची खूप कारणे  आहेत पण सर्वसाधारण्पणे अलिकडचे धकाधकीचे जीवन, त्यामुळे होत असलेली चीडचीड आणि मनासारखे घडत नसल्याने येणारी निराशा व पराकोटीचा क्रोध;यातून कल्पनेपलीकडचे विकृत प्रकार समोर येऊ लागले आहेत. आता राग येणे आणि तोही टोकाचा  त्याला काही प्रमाणात मानसिक अवस्था कारणीभूत असल्याचे समोर आले आहे,
पण त्याचवेळी पुरुषांच्या तुलनेत सोशिक समजदार असलेल्या महिला पूर्वीच्या तुलनेत पुढे जाण्याच्या संधी असताना किंवा असला वाईट विचारही मनात आणू शकत नाहीत अशी ख्याती असताना व ज्यांची  निर्मिती दया, क्षमा, शांती व प्रेमासाठी झाली असताना त्या महिला  बदलत्या जमान्यात इतक्या क्रूरपणाचे प्रतिक का होऊ लागल्यात? हे जसे प्रश्न आहेत अगदी तसेच विचार करण्यासारखा मुद्दा हा ठरतो की, एखाद्या घटकाला सवलती दिल्या की सुधारणेबरोबरच तो शेफारूही शकतो आणि तसे होत असेल तर मग काय  करायचे? उत्तरही शक्य तितक्या लवकर शोधायला हवे. १४ ते १५ वर्षाच्या पोरी बॉयफ्रेंडसाठी भर रस्त्यात एकमेकींच्या झिंज्या धरतात, तेव्हा त्यांना पालक, शिक्षक किंवा समाजाचे भय म्हणण्यापेक्षा लाज वाटत नाही हे जरा, रुबाबदार ताई आणि हातवारे करणाऱ्या चिडखोर माईनी लक्षात घेऊन त्यावर भाष्य करावे त्याची दखल घ्यावी,कारण हे प्रकारही दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत.  २३-२४ वर्षांची मुलगी दोन बॉयफ्रेंडसाठी आईचे तुकडे करून कपाटात ठेवते, त्यावर कुणी साधा निषेध करून कडक कारवाई करा अशा मागणीचे निवेदन द्यायला तयार नाही, यावरून समाज आणि चळ्वळवादी यांचा दुटप्पीपणा दिसतो. वास्तविक हे  कृत्यसुद्धा श्रद्धा प्रकरणाइतकेच क्रूर आहे पण त्याची माध्यमात चर्चा झालेली नाही. विकृत मनोवृत्तीला किंवा गुन्हेगाराला जात किंवा लिंग अशा भेदात तोलण्याचा प्रयत्न जर समाज किंवा कुणी करत असेल तर तोसुद्धा दांभिकपणा असून त्यातून गैरप्रकार फोफावण्यास मदत होते हे विसरता कामा  नये. बदलत्या युगात मुलांप्रमाणे मुली इतर चांगल्या क्षेत्राबरोबरच वाईट क्षेत्रातही टोकाची कृत्ये करत असल्याने येथेही आम्ही कमी नाहीत हे दाखवून देत मुलगी झाली... प्रगती झाली हे बिरुद चांगलेच सत्कारणी लावलेले दिसत आहे. अर्थात सुजाण पुरुषांना जसा सरसकट पुरुष जातीचा उद्धार कुण्या बाईने  केल्यावर राग येत नाही तसे महिलांमधील विक्षप्तपणा दाखवल्यावर तो  कबूल करण्याचे औदार्य महिला दाखवतात की नाके मुरडतात ते आता पाहायचे....  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!