का धरिला परदेश? 

अमेरिकेचे व्हिसा धोरण व तेथील कंपनांच्या ऑफर्स, कॅनडामध्ये अवजड वाहने चालवणाऱ्यांना  असलेला भरपूर वाव,इंग्लडमध्ये रोजगार व  शिक्षण आणि ऑस्ट्रेलियात चार्टर्ड अकाउंटंट, वकील, डॉक्टर्स याना भरपूर स्कोप  असल्याने त्या त्या देशाकडे  सुरुवातीला पाय वळतात आणि तिथेच घरकुलासाठी सहज मार्ग उपलब्ध असतात जोडीला पुरेशी  मिळकत होणे शक्य असल्याने  भारतीय तिथे स्थायिक होतात, त्यातच भारताला दुहेरी नागरिकत्व मान्य नसल्याने आणखी एक पंचाईत झालेली आहे. अशा सर्व परिस्थितीत आपण मात्र का धरिला परदेश? असा सवाल करत राहायचे!
---------------------------------                             --------------------------------------------------------------------
मस्या काय आहे आणि ती भविष्यात कशी वाढण्याची शक्यता आहे याचे आकडेवारीसह समोर उदाहरण असतानाही काय करायचे आणि काय तोडगा शोधायचा यावर चर्चा ना करणे किंवा सोयीस्कर दुर्लक्ष करणे, यातच भारत सोडून लोक मोठया संख्येने परदेशात  स्थायिक का होऊ लागलेत याचे उत्तर दडलेले आहे. देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याला आळा घालण्याच्या सर्व योजना निष्फळ ठरताना दिसत असल्याने   प्रतिवर्षी लाख- दीढ लाख देश सोडून गेले तर भारत सरकारचे काही बिघडतेय, असे मागील अकरा वर्षांची आकडेवारी हाती असूनही काही उपाय नाहीत व चर्चा नाही यावरून अनुमान निघाले तर तो कुचेष्टेचा मुद्दा वाटण्याची गरज नाही. आता एकाएकी भारतीय नागरिक विदेशात मोठया संख्येने जाण्याच्या  मुद्द्याचे विवेचन करण्याचे कारण म्हणजे सध्या संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून त्यात राज्यसभेत सरकारकडून २०११ पासूनची आकडेवारी जारी करण्यात आली त्यानुसार २०२० चा अपवाद सोडला तर प्रत्येक वर्षी जवळपास दीढ लाख लोक भारत सोडून विदेशात नागरिकत्व स्वीकारतात असे स्पष्टपणे दिसत आहे. २०२० मध्ये हे प्रमाण कमी असण्याचे कारण कदाचित कोरोना निर्बंध हे एक असू शकते पण त्यानंतर २०२२ मध्ये तब्बल अडीच लाख नागरिक मायदेशाला बाय - बाय करून निघून गेलेत हे बाब पुन्हा लक्षवेधी आहेच. जवळपास १३५ देशांमध्ये भारतीयांनी  बस्तान बसवल्याची माहिती आहे. आता हे सर्व झाल्यावर मुळात  कुणी आणि कुणाच्या सरकारला नेमका  दोष  द्यायचा हा प्रश्न असल्याने त्यावर जास्त चर्चा करण्यापेक्षा अळीमिळी गुपचिळी राखणे सत्ताधारी आणि विरोधकांनाही परवडणारे आहे,असे दिसते.
आता प्रश्न असा पडतो की भारत सोडून नागरिक  मोठ्या संख्येने विदेशात का जातात, त्याची अनेक कारणे तज्ज्ञांनी दिलेली आहेत आणि ती भारतीय राजकारणासह परिस्थितीवरून त्या त्या वेळच्या सरकारला आरसा दाखवणारी आहेत. देश स्वतंत्र होऊन इतकी  वर्षे झाली पण अनेक बाबतीत व्हाव्या तशा सुधारणा  झालेल्या नाहीत . शैक्षणिक क्षेत्रात आपण आता कुठे विदेशी उद्यापीठाना  साद घालतोय पण देशी शिक्षणाचा दर्जा उंचावण्यापेक्षा फीचा आलेख प्रतिवर्षी उंचावत आहे. त्यातच मर्यादित कोटा आणि जाचक अटी याचा विचार करून लोक विदेशाची वाट चोखाळतात . डॉक्टर होण्यासाठी युक्रेनला जाणे इतपत ठीक पण हाच हेतू ठेऊन जर शेजारच्या बांग्लादेशमध्ये कुणी जात असेल तर त्याला काय म्हणाल? असे हे चित्र आहे. आता इथे एक लक्षात घ्यावे लागेल की  शिक्षणासाठी किंवा कामासाठी  कुणी कुठेही जावे त्याविषयी असूया  असण्याचे कारण नाही. 
जशी ज्याची ऐपत तसा  देश निवडतात. अमेरिकेत इंजिनिअर किंवा अन्य क्षेत्रातील काही कंपन्या मोठ्या पगाराच्या ऑफर्स गुणवान विद्यार्थ्यांना  करत असतात. त्यामुळे ते तिकडे जाऊन मग तिथेच राहतात. कॅनडा, ऑस्ट्रेलिया व ब्रिटनमध्येही राहण्याकडे काहींचा कल अधिक आहे. त्यात यूएई मधेही मोठ्या संख्येने भारतीय आढळतात.. काहींना भारतीय हवामान सूट  होत नाही म्हणून उतार  वयात देश सोडतात कारण त्यांची मुले आधीच विदेशात राहत असतात आणि त्यांना परत भारतात येणे शक्य नसते हे एक कारण आहे तर काहीवेळा  टॅक्स वसुलीचे धोरण व त्या बदल्यात सरकारकडून टॅक्सधारकांना सुविधा पुरविताना होणारी मारामार, आर्थिक घोटाळा व अन्य गुन्हे करून विदेशात आश्रय घेणे,विदेशातील सोयीसुविधा आणि फ्री संस्कृती  तसेच जो शिस्तप्रिय आहे त्याला साजेसे अनुकूल वातावरणाने या पलीकडे जाऊन काही सांगायचे तर भारतातील राजकीय परिस्थिती . आता हा  शेवटचा मुद्दा असा आहे की, त्यात सुधारणा झाल्यास  सर्व आपोआप चित्र बदलू शकते. एकीकडे जगातील आर्थिक महासत्ता होण्याची स्वप्ने रंगवायची आणि दुसरीकडे जुने कालबाह्य धोरण बदलायचे नाही याचा फटका जर विचारवंत किंवा गुणवान नागरिकांना बसू लागला तर ते पर्याय मिळताच परदेशाची वाट धरतात. त्यांना देशप्रेम नाही असे नव्हे पण प्रत्येक माणूस आपल्या गरजा ओळखून त्याच्या कुवतीनुसार तो मार्ग अवलंबत असतो. तसे पहिले तर आता सर्व्हे केल्यास अनेकजणांना विदेशात जाऊन राहावे असे वाटत असेल पण त्यांचे हात आणि परिस्थिती तोकडी आहे. आजकाल जागतिकीकरणाच्या युगात भारताला खूप बदलावे लागेल आणि त्याची सुरुवात राजकीय वातावरण जे  खालच्या पातळीवर निघाले आहे ते थांबवून, आपण आपल्या देशातील गुणवान इथेच राहावेत व  त्यांना या देशात मोठे होऊन देशाचा लौकिक वाढवायची संधी मिळण्यासाठी काय करावे लागेल यावर गंभीर विचार व्हायला हवा.  त्यासाठी सत्ताधारी असोत वा विरोधक त्यांनी एकत्र येऊन यावर धोरण ठरवायला हवे. आजकाल देशात अशी परिस्थिती आहे की प्रशासकीय अधिकारी अतोनात मेहनत करून आणि विविध परीक्षा देऊन त्या पदावर बुद्धीचे कौशल्य वापरून  पोचतो पण त्याचा बॉस म्हणून आलेला मंत्री पाहिला तर त्याला धड बोलताही येत नाही. अशांच्या हाताखाली काम करण्यासाठी या गुणवान लोकांचा जन्म आहे का,याचा विचार मंत्रिपद वाटणाऱ्यानी करायला हवा. विदेशात अशी चमत्कारिक परिस्थिती  दिसत नाही. ते आपला आणि दुसरा असा भेदभाव न करता फक्त गुणवत्ता बघून न्याय देतात. बराक ओबामा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी राहणे किंवा सध्या ऋषी सुनक  ब्रिटिश पंतप्रधानपदी येणे हे त्यांचे मूळ बघून झालेले नाही. भारतात मात्र सोनिया गांधी यांचे  विदेशी मूळ हा मुद्दा मध्यंतरी इतका गाजला की  त्यातून नवा पक्षही जन्माला आला.. यासारख्या अनेक कारणांनी किंवा भारतात दरडोई उत्पन्न वाढण्याची शक्यता दुरापास्त असल्याने, तुलनेत विदेशात श्रमाला योग्य प्रमाणात मोबदला मिळत असल्याने तिकडे जाण्याकडे कल वाढलेला दिसत असून अमेरिकेचे व्हिसा धोरण व तेथील कंपनांच्या ऑफर्स, कॅनडामध्ये अवजड वाहने चालवणाऱ्यांना  असलेला भरपूर वाव,इंग्लडमध्ये रोजगार व  शिक्षण आणि ऑस्ट्रेलियात चार्टर्ड अकाउंटंट, वकील, डॉक्टर्स याना भरपूर स्कोप  असल्याने त्या त्या देशाकडे  सुरुवातीला पाय वळतात आणि तिथेच घरकुलासाठी सहज मार्ग उपलब्ध असतात जोडीला पुरेशी  मिळकत होणे शक्य असल्याने आपले भारतीय तिथे स्थायिक होतात त्यातच भारताला दुहेरी नागरिकत्व मान्य नसल्याने आणखी एक पंचाईत झालेली आहे. अशा सर्व परिस्थितीत आपण मात्र का धरिला परदेश? असा सवाल करत राहायचे इतकेच!
,  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute