कुहू ची कैफियत !


 कावळेदादा आणि त्यांच्या सौ. कुठे शिफ्ट झाल्या  माहित नाही पण त्याची झळ  या कोकीळरावांना आणि कोकिळाबाईंना मोठ्या प्रमाणावर बसलेली दिसते कावळेदादांच्या घरात अंडी घालून पलायन करायचे आणि आपली पिल्ले त्यांच्या हवाली करण्याचा कोकिळाबाईंचा उपक्रम सध्या खूप थंडावलेला असल्याने आता काय करायचे बुवा?अशा विवंचनेत असलेले कोकीळराव सकाळीच आमच्या खिडकीवर येऊन कुहू -कुहू करू लागले. आता त्यालाही कारण तसेच आहे,काही दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी कावळेदादा बसले होते त्यांचा बहुदा पत्ता विचारण्यासाठी हे महोदय आले असावेत. पण कावळेदादा आले होते ते चपाती मागायला हे काही कोकीळरावांना माहित नव्हते. समोरच्या उंबराच्या झाडावरील दोन फळे दत्त मंदिराच्या   पत्र्यावर टाकून कोकीळ जोडी पुढे निघून गेली तर नियमित विद्यार्थ्यासारख्या चिमण्या मात्र चिवचिवाट करत राहिल्या.

---------------------------------------------                    -----------------------------------------------------
हिवाळा संपून उन्हाळ्याला सुरुवात होत असतानाची कोकीळ साद ऐकून  मन प्रसन्न झाले. तशी कुहू- कुहू साद कुणाला गोड वाटत नाही? कोकीळचा आवाज बरोबर नाही, असे म्हणणारा विरळच आणि असला तरी त्याला अरसिक हिणवण्याचेही काही कारण नाही. आपल्याला आवडत असलेले, समोरच्याला आवडेल असे नाही हा खरा त्यामागील मुद्दा. मकरसंक्रातीनंतर हळूहळू सूर्यप्रकोप वाढू लागला व छोटे नाले पाण्याविना ओस पडू लागले. अशावेळी पशु व पक्ष्यांना अन्नासाठी कुठे आणि किती भटकावे लागेल काही सांगता येत नाही अशी दुर्दैवी अवस्था  आहे. एकीकडे हाताला काम नाही म्हणून, किंवा आहे ते काम धड नाही म्हणून माणसाची कटकट रोजचीच असताना, इतर पशुपक्ष्यानासुद्धा समस्या आहेत हे आपल्याला ठाऊक नसते म्हणण्यापेक्षा आपल्या समस्येपुढे त्या काहीच नाहीत असे समजून त्याकडे डोळेझाक केली की हुशारपासून ते लबाड व मूर्ख माणसाचे  काम भागते. उन्हाची रणरण वाढू लागल्याने आता रानोमाळी फिरून किडे मुंगी किंवा कीटक मिळण्याचा हा मौसम नाही हे लक्ष्यात आलेल्या कोकीळने मानवी वस्ती गाठणे तसे स्वाभाविकच म्हटले पाहिजे. भल्या सकाळी कुहू कुहू करून भूपाळी ऐकवणार हा पक्षी सध्या रोज भेटतो आणि कीटक- मुंग्याना पर्याय म्हणून मिळालेल्या  तुकडा गोड मानून पुढची वाट तो धरतो. कोकिळवर अशी वेळ यावी हे काही चांगल्याचे लक्षण नाही. तसे चिमण्या आणि इतर पक्षी भात अथवा दाणे, चपातीचे तुकडे यापैकी जे मिळेल त्यावर उदरनिर्वाह करतात कारण त्याला इलाज नसतो हे त्यांना चांगले ठाऊक आहे.  यात पारवा हा पक्षी तसा पुण्यवान म्हणायला हवा कारण कोणत्याही शहरात एखादी नवी बिल्डिंग उभी राहिली की  त्याचे उद्घाटन कोणतेही पद  नसताना सफेद कम काळ्या रंगांने तो करत असतो, जोडीला वेळकाळ याचे भान न बाळगता गुटर्गु सारखा कर्कश आवाज करून झोप हा माणसाचा कसा शत्रू आहे वैगेरे तो सांगत असतो, पण झोपाळू माणसाला ते कळत नाही हा एक मुद्दा आहे.  या साऱ्यात आमच्या बालपणी हातातून बिस्कीट खेचून नेणाऱ्या कावळेदादाचे मात्र खूप वाईट वाटते कारण आज तो पाहायलाही मिळत नाही.
पिंडाला शिवण्याचा मान असलेला हा पक्षी खूप प्रमाणात कमी झालाय त्यामुळे त्याची कावकाव किंवा खाणे मिळवण्यासाठीची धडपड आता पाहायला मिळत नाही. कावळेदादा आणि त्यांच्या सौ. कुठे शिफ्ट झाल्या  माहित नाही पण त्याची झळ  या कोकीळरावांना आणि कोकिळाबाईंना मोठ्या प्रमाणावर बसलेली दिसते कावळेदादांच्या घरात अंडी घालून पलायन करायचे आणि आपली पिल्ले त्यांच्या हवाली करण्याचा कोकिळाबाईंचा उपक्रम सध्या खूप थंडावलेला असल्याने आता काय करायचे बुवा?अशा विवंचनेत असलेले कोकीळराव सकाळीच आमच्या खिडकीवर येऊन कुहू -कुहू करू लागले. आता त्यालाही कारण तसेच आहे,काही दिवसांपूर्वी त्याच ठिकाणी कावळेदादा बसले होते त्यांचा बहुदा पत्ता विचारण्यासाठी हे महोदय आले असावेत. पण कावळेदादा आले होते ते चपाती मागायला हे काही कोकीळरावांना माहित नव्हते. समोरच्या उंबराच्या झाडावरील दोन फळे दत्त मंदिराच्या   पत्र्यावर टाकून कोकीळ जोडी पुढे निघून गेली तर नियमित विद्यार्थ्यासारख्या चिमण्या मात्र चिवचिवाट करत राहिल्या. कोकीळ या पक्ष्याच्या जगात जवळपास १२० च्या आसपास विविध जाती असून अंटार्टिका वगळता तो इतर सर्व भागात कमी अधिक फरकाने आढळतो. जंगलात त्याचे वास्तव्य असून तिथे किडे अथवा कीटक खाऊन तो जगत असतो. या पक्ष्याचे आयुष्य   ४ ते ६  वर्षांचे आहे आणि मादी डझनभर अंडी घालते. तिला गाता येत नाही, कोकीळ गातो हे वास्तव आहे.  पण हा पक्षी स्वतः घरटे बांधत नाही तर इतर  म्हणण्यापेक्षा  कावळ्याच्या घरट्यात अंडी  देतो. आता कावळेच कमी झाले तर त्यांची घरटी कुठे असणार ?आणि जंगले कमी झाल्याने पक्ष्यांचे खूप हाल होत आहेत. या आणि इतर समस्या घेऊन  कोकीळ आलेला होता. त्याला खाण्यासाठी तुकडा नको होता तर काय करायचे , कुठे राहायचे,आमचे भविष्यात काय होणार या आणि असंख्य प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी तो आला होता,तसे पाहिले तर हा लाजवट पक्षी पण आता तोही  बोलता झाला. या जगात बोलल्याशिवाय आणि मागितल्याशिवाय काही मिळत नाही हे त्याने जाणले होते.  ते सर्व अन्यायग्रस्त प्राणी आणि  पक्ष्यांचे प्रतिनिधित्व होते पण आमच्यासारखे सामान्य, या गोड आवाजाच्या पक्ष्याला खाणे टाकण्यापलिकडे . दुसरा विचार  काय करणार ? त्यांच्या समस्या एखाद्या  लेखातून  मांडण्याव्यतिरिक्त या घडीला तरी आमच्या हाती  दुसरे काही नाही!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute