शिळ्या कढीचा भुरका! 

देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे अल्प तासांच्या सरकारचा  शपथविधी दिल्ली दरबाराच्या आशीर्वादाने पार पडला हे खरे मानले तर दिल्लीशी खास पडद्याआडून दोस्ती असलेले पवारसाहेब तसा  त्यांचा मुखभंग करणार नाहीत हे हमखास सांगता येते. फडणवीसांना २०१४ मध्ये राज्यात  फ्री हॅन्ड दिल्याने जे झाले ते टाळण्यासाठी व त्यांचे अधिकार मर्यादित करून, शिवाय पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी ही अल्प शपथविधीची स्क्रिप्ट तयार करण्यात आली होती का आणि त्यात सर्व वरिष्ठ पडद्यामागे एक होते का असे सवाल उपस्थित होतात कारण टाळी एका हाताने वाजत नाही, हे सरळ आहे.
                                  ----------------------------
पुरोगामी महाराष्ट्र राज्यात वावरणाऱ्या नेत्यांना शिळ्या कढीची चव रोजरोज  इतकी का गोड लागते, काही माहित नाही पण शिळ्या कढीला ऊत आणण्याची एक संधी  सोडायला ते तयार नसतात. आता हा मुद्दा आल्यावर पहाटेचा शपथविधी या मुद्द्यावर चर्चा होणार हे वेगळे सांगण्याची गरज नसावी. तसे पहिले तर हा पहाटे तयारी सुरु झालेला आणि भल्या सकाळी पार पडलेला  शपथविधी मुळात २०१९ चा आहे. त्यावर अधूनमधून बोलून अजित पवार याना डिवचण्याचा प्रयत्न केला जायचा आणि मग दादा त्यावर, ते जुने झाले राज्यासमोर इतर मुद्दे आहेत त्याची चर्चा होऊ द्या असे शहाणपणाचा सल्ला देत  असत. त्यानंतर हे प्रकरण पुढे नेण्याचे श्रेय खऱ्या अर्थाने राजकारणातील मिस्टर कुल असणाऱ्या जयंतराव पाटील यांना द्यायला हवे. तसे या जयंतरावांचे दादांशी तितकेसे जमत नाही अशी कुजबुज अधूनमधून ऐकायला मिळते त्यामुळेच की  काय ते कळत नाही पण राष्ट्रवादीचे जुनेजाणते अध्यक्ष शरद पवार यांनी शपथविधीचा मुद्दा आता जुना झाला असे सांगूनही त्यावर भाष्य केले आणि दादा व देवेंद्र याना पुढचे अंक सादर करायला लावले. 
पण जयंतरावांच्या त्या माहितीतून एक  कळून चुकले  की पहाटेचा शपथविधी राज्यात  राष्ट्रपती राजवट लांबवण्यासाठी  राष्ट्रवादीने केलेली एक खेळी होती. एकीकडे महाविकास आघाडी तयार होत असताना शरद पवारांनी हा लढवलेला डावपेच अफलातून होता यात वाद नाही पण त्याला दिल्लीश्वरांचा  आपल्याच माणसाची वटवट जिरवण्यासाठी आडून पाठींबा होता का, असा एक प्रश्न पडतो. त्याचे कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे अल्प तासांच्या सरकारचा  शपथविधी दिल्ली दरबाराच्या आशीर्वादाने पार पडला हे खरे मानले तर दिल्लीशी खास पडद्याआडून दोस्ती असलेले पवारसाहेब तसा  त्यांचा मुखभंग करणार नाहीत हे हमखास सांगता येते आणि त्यामुळेच फडणवीसांना २०१४ मध्ये राज्यात  फ्री हॅन्ड दिल्याने जे झाले ते टाळण्यासाठी व त्यांचे अधिकार मर्यादित करून शिवाय पाठीत खंजीर खुपसला म्हणून शिवसेनेला धडा शिकवण्यासाठी ही अल्प शपथविधीची स्क्रिप्ट तयार करण्यात आली होती का आणि त्यात सर्व वरिष्ठ पडद्यामागे एक होते का असे सवाल उपस्थित होतात कारण टाळी एका हाताने वाजत नाही, हे सरळ आहे. 
आता राहता राहिला प्रश्न तो, या घडीला यावर पुन्हा पुन्हा भाष्य का करण्यात येत आहे आणि त्याची खरेच गरज आहे का?  कारण आपल्या राज्यासमोर खूप समस्या आहेत आणि त्यावर कुणीतरी एकाने मुद्द्याचे बोलावे तर ते होत नाही, हे जुने विषय का चघळतात ही मंडळी असा सवाल सामान्यांना पडणारच आणि आता त्याचे उत्तर शोधताना थोडे विषयांतर करावे लागणार आहे. आगामी काही काळात राज्यात निवडणुकीची धामधूम असल्याने त्याची पूर्वतयारी सध्या जोरात सुरु आहे आणि प्रत्येक पक्ष आपल्या प्रचाराची दिशा ठरवत आहे,  असे असताना जे मतदारांना प्रभावित करू शकतात असे मुद्दे व त्याच्याशी  संबंधित प्रभावी व्यक्ती यांचा उहापोह आताच करून टाकलेला बरा, अशी या पक्षांची भूमिका दिसते. आता या दुष्टीकोनातून पाहिल्यास जयंतरावांच्या विधानाचा अर्थ असा होतो की राष्ट्रवादीला भाजपबरोबर जायचेच नव्हते तर तो एक डावपेच होता,म्हणजे त्यांची यातून सुटका झाली.
 राहता राहिला भाजप, तर या पक्षाचे बुद्धिवंत आणि मिस्टर वॉल देवेंद्र फडणवीस हे थोडेच कमी पडणार आहेत, त्यांनी तर अप्रतिम खेळी केली आणि पहाटेच्या शपथविधीला पवारांची मान्यता होती व खातेवाटप,तसेच केंद्रातील सत्तेत वाटा  हे ठरले होते आणि वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याने आपल्याला काही वावगे कसे वाटले नाही हे तर सांगितलेच पण जोडीला शरद पवारांनी आयत्यावेळी कच खाऊनही, दादा आपल्यासोबत राहायला कसे तयार होते हे सांगून राष्ट्रवादीत खळबळ कशी उडेल हे पहिले आणि वर प्रत्येकवेळी सर्व जमून येतेच असे नाही हे सांगून आपण कसे खरे ते सांगण्याचा प्रयत्न केला  व राहिलेली माहिती अजितदादा सांगू शकतात असे सांगून पोटनिवडणुकीच्या प्रचारात भाजपवर टीका करू पाहणाऱ्या अजित पवारांना एका वेगळ्याच अडचणीत टाकले. आता या साऱ्यावर काहीतरी बोलायला हवे म्हणून शरद पवारांनी, फडणवीस यांच्यासारखा माणूस असत्याचा आधार घेईल असे वाटले नव्हते वैगेरे सांगून आपल्याला सेफ करण्याचा प्रयत्न केला खरा पण आता या मुद्द्यावर एक तर फडणवीस खोटे बोलत आहेत किंवा पवार काहीतरी लपवत आहेत,असा निष्कर्ष काढण्यास वाव उरतोच आहे. पवारांची आजवरची राजकीय वाटचाल आणि डावपेच आखण्याची पद्धत पहिली तर या शपथविधीचा मुद्दा त्यांची काही काळ गोची निर्माण  करू शकतो. पण त्यावर उपाय म्हणून पवार, भाजपचा दिल्ली दरबार गाठून राज्यात त्यांनी  गडकरी व आशिष शेलार असे दुसरे  नेतृत्व दिल्यास आपण वेगळा विचार करू शकतो असे सांगून फडणवीस याना केंद्रात जायला पडद्यामागे राहून भाग पडू शकतात कारण असे झाले तर पहिले अमित शहा खुश होतील. केंद्रात एखादे पद  देऊन फडणवीस याना गप्प करण्याची त्यांची चाल सत्यात उतरू शकते. 
आता हे सर्व तितकेसे सोपे नाही बरे का,आमचे देवेंद्र फडणवीस तुम्हाला कच्चे खेळाडू वाटले का? एकदा ठेच लागल्यावर शहाणे होऊन ते इतके तरबेज झालेत की  बोलूच नका. त्यासाठी जरा वरळीतील शिंदेची रिकाम्या खुर्च्यांसमोरील सभा आठवा.  त्या सभेला फडणवीस साहेब नव्हते तिथे इतर सर्व होते पण गर्दी  जमेल तर शपथ. यातुन फडणवीसांनी एका दगडात दोन पक्षी मारले. राज्यात शिंदे लोकप्रिय नाहीत हे दिल्लीश्वरांना दाखवून दिले आणि आपल्या अपरोक्ष अमित शहांशी फोनवर बोलणाऱ्या शिंदेंना धक्का दिलाच पण राज्यात आपल्याशिवाय पर्याय नाही हे दाखवून  दिले. तिकडे आणखी चाली खेळून कुणाचा लहान भाऊ आणि कुणाचा मोठा भाऊ होऊन  फडणवीस चर्चेत आहेतच म्हणजे २०२४ला दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद, अशी पुन्हा भाजपशी स्लोगन असू शकते. आता हे सर्व झाल्यावर पहाटे शपथविधीच्या जुन्या राजकीय शिळ्या कढीचा भुरका नेते का मारताहेत हे तुमच्या ध्यानी आले असेलच पण ही कढी आंबट, तिखट  खारट  आणि गोड  असल्याने फडणवीस आणि पवार या मुरब्बीनाच  त्याचा भुरका मारू द्या इतरांनी वास घेऊन व्वा क्या बात है म्हणण्याइतपत ठीक आहे पण चव घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा ठसका लागण्याची भीती आहे , तेव्हा अजितदादांसह भाजपच्या इतर मंडळींनी या शिळ्या कढीपासून दूर राहणे इष्ट वाटते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute