महंत... प्रज्ञावंत 

आपण महाराष्ट्राचे राज्यपाल आहोत आणि आता आपले पहिले प्राधान्य महाराष्ट्र, हे पदावर असताना कोश्यारीनी स्वतःला बजावले होते का? याचे उत्तर त्यांच्याकडे काय असायचे ते असू दे, पण त्यांचे पदावर असतानाचे वर्तन पाहता कोश्यारी महाराष्ट्राला आपला मानत नव्हते, असाच निष्कर्ष निघतो. आता राहता राहिला प्रश्न त्यांनी शेरा मारलेल्या माविआबाबतचा किंवा त्यांना दिसलेल्या शकुनीमामाचा. राज्यपाल पदावर असताना आपली जबाबदारी टाळून महाभारतातील पात्रे  कोश्यारी महाराष्ट्रात कशाला शोधत होते, त्यांना आपल्यातला  धृतराष्ट्र स्पष्ट दिसत होता की आपण महाराष्ट्राऐवजी महाभारतात आहोत असे त्यांना वाटत होते,असे कितीतरी प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात. 

 प्रज्ञावंत, कर्तव्यनिष्ठ आधुनिक आज्ञाधारक आणि त्याहूनही एखाद्या अपरिचिताला विदूषकच वाटावेत असे  महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा विसर इतक्या लवकर पडणे तसे शक्यच नाही. ते राज्यपाल पदावरून पायउतार झाल्यामुळे जरा हात सैल सोडून लिहिण्याची संधी मिळावी अशी बहुधा त्यांचीच इच्छा असावी आणि म्हणूनच महाराष्ट्रातून जाता जाता त्यांनी आपण कसे पवित्र, जोडीला उद्धव ठाकरे  कसे संत माणूस, आदित्य ठाकरेंवर आपले कसे पुत्रासारखे प्रेम आणि पहाटेचा शपथविधी कसा पार पडला वैगेरे सुरसकथा अशा काही ऐकवल्या की  काही उथळ विचारांच्या मीडियाला  ती कडक, रोखठोक आणि तडाखेबंद अशी मुलाखत वाटली. त्याचा परिणाम म्हणजे याच  कोश्यारी महोदयांनी महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अवमान केला होता हे येणाऱ्या काळात महाराष्ट्र विसरेल आणि कोश्यारीसुद्धा आपण तितकेसे काही वावगे केले नाही असे समजून पुढची वाटचाल करण्यास मोकळे होतील. आता त्यांना उत्तराखंडच्या जनतेची सेवा करायची आहे आणि त्यामुळे त्यांना राजकीय क्षेत्रापासून दूर राहायचे आहे. मुळात भगतसिंग कोशारीना बहुधा  हे माहित नसावे की  एखाद्याला जेव्हा जीवनगौरव देतात तेव्हा  त्याने गठडी बांधण्याची तयारी करावी हे जसे अलिखित पण गृहीत धरले जाते अगदी तसेच जेव्हा घटनात्मक पदावर एखाद्याची  नियुक्ती करतात तेव्हा आपोआप त्यांनी या पदाचा कार्यकाळ संपला की  गाटोडे गुंडाळून उर्वरित आयुष्य मजेत आणि राजकीय मोह टाळून जगावे असे अपेक्षित आहे.आता भगतसिंग कोश्यारी यांना याचा विसर पडला असावा म्हणण्यापेक्षा त्यांच्या लेखी तो विचाराचा मुद्दा  नसावा.त्यामुळे आपण राजकीय जीवनापासून दूर राहू इच्छितो असे या घडीला ते बिनधास्तपणे सांगताना दिसतात.तसे या कोश्यारीना राज्यपाल व्हायचेच नव्हते पण त्याचे झाले असे की  मोदीजींनी आग्रह धरला आणि त्यांना तो शब्द मोडता आला नाही आणि त्यातच  महाराष्ट्राचे भाग्य की  हे आधुनिक काळातील प्रज्ञावंत राज्यपाल या राज्याला मिळाले. तसे पहिले तर ते बहुगुणी पण महाराष्ट्रातल्या अल्पमतींनी त्यांचा अवमान केला , हे पातक त्यांनी टाळायला हवे होते.पण काय करणार तितका विचार या साऱ्यांना  सुचला नाही.  कोश्यारींचे मात्र तसे नाही या वयातही त्यांचे कर्बहुल्या आणि विचार करण्याची इतकी अजब शक्ती आहे की, आता पदमुक्त झाल्यावर त्यांना एकेक साक्षात्कार होऊ लागलेला दिसतो त्यातील पहिला म्हणजे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाला लायक नव्हते. आता कोश्यारींचा  हाच निकष त्यांच्या पदाच्या बाबतीत लावला तर काय होईल आणि त्याचे उत्तर काय असेल हे त्यांनी आता मोकळ्या वेळेत विचार करून शोधलेले बरे. प्रत्येक प्रश्नाला  उत्तर हे असतेच त्याप्रमाणे कोश्यारी यांनी आपण आमदारांच्या यादीला का मंजुरी दिली नाही किंवा पत्रात वापरलेली भाषा यावर बोट ठेवणे स्वाभाविक आहे. पण त्याचवेळी त्यांनी स्वतः महापुरुषांचा अवमान का केला आणि त्यातून महाराष्ट्र अशांत करून एका जबाबदारीच्या पदावर असताना त्यांना काय मिळाले हे त्यांनी सांगितले नाही की, प्रश्नकर्त्याना त्याचा सोयीनुसार विसर पडला ते माहित नाही. मुळात आपण महाराष्ट्राचे राज्यपाल आहोत आणि आता आपले पहिले प्राधान्य महाराष्ट्र, हे पदावर असताना कोश्यारीनी स्वतःला बजावले होते का? याचे उत्तर त्यांच्याकडे काय असायचे ते असू दे, पण त्यांचे पदावर असतानाचे वर्तन पाहता कोश्यारी महाराष्ट्राला आपला मानत नव्हते, असाच निष्कर्ष निघतो. आता राहता राहिला प्रश्न त्यांनी शेरा मारलेल्या माविआबाबतचा किंवा त्यांना दिसलेल्या शकुनीमामाचा. राज्यपाल पदावर असताना आपली जबाबदारी टाळून महाभारतातील पात्रे  कोश्यारी महाराष्ट्रात कशाला शोधत होते, की त्यांना आपल्यातला  धृतराष्ट्र स्पष्ट दिसत होता की आपण महाराष्ट्राऐवजी महाभारतात आहोत असे त्यांना वाटत होते,असे कितीतरी प्रश्न उपस्थित करता येऊ शकतात. तसे पहिले तर कोश्यारी हे खूप विचारी आणि त्यांना वाचन, भटकंतीची खूप आवड.  फिटनेस आणि मानापमानाच्या भानगडीत फार न जाण्याची त्यांची सवय हे गुण हेरून मोदींनी त्यांना महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आणलेले होते पण  झाले तिसरेच.आता अलीकडची त्यांची विधाने अडचणीची  ठरत होती. सत्ता नव्हती तेव्हा ठीक होते पण सत्ता आल्यावर या वादग्रस्त विधानांचा बचाव करताना नाकीनऊ येत होते. त्यामुळे कोशारीना  हटवणे भाग होते. आता हे सर्व झाल्यावर एक मुद्दा महत्वाचा ठरतो आणि तो म्हणजे वरिष्ठ आपल्याकडे जबाबदारी देतात आणि त्यांचा शब्द मोडणे जीवावर येते असे सांगणारी मंडळी मग त्याच वरिष्ठांच्या विश्वासाला तडा जाईल असे का वागतात? भगतसिंग कोश्यारी यांनी आपल्या आताच्या मुलाखतीत विविध मुद्दे मांडताना आपल्या चुका कबुल करण्याचे टाळणे म्हणजेच आपल्या वरिष्ठांचा किंवा पंतप्रधान मोदींचा अवमान करण्यासारखेच आहे कारण मोदी आणि शहा हे शिवभक्त आहेत असे फडणवीस म्हणतात ते खरे असेल तर मग त्याच शिवाजी महाराजांचा अवमान करणारे कोश्यारी त्यांना कसे चालले किंवा कोश्यारीसुद्धा आपल्या पक्षाला शिवाजी महाराज वंदनीय आहेत हे कसे विसरले? या प्रकाराची भरपाई कशी होणार असे विविध मुद्दे असून त्यावरून अन्यत्र लक्ष वेधण्यासाठी कोशयरीनी राष्ट्रपती राजवट मागे  का घेतली, सकाळचा शपथविधी कसा काय झाला या तोंडी  लावायला पुरण्यासारख्या आणि तोंडाला पाने पुसायला पुरेशा रंजक घटना आहेत आणि म्हणूनच आजकालच्या शब्द बदनामीच्या युगात कोश्यारी हे त्यांच्या पक्षासाठी निष्ठावान प्रज्ञावान आणि एकनिष्ठ ठरतात जे आखून दिलेला कार्यक्रम पूर्ण करून आता स्वगृही निघालेत. ते काहीही करोत पण आपण काही मर्यादा ओलांडून चालणार नाही.  महाराष्ट्राच्या सभ्य संस्कृतीचा आणि त्यांच्या वयाचा आदर करून पुढील आयुष्यासाठी शुभेच्या देऊन आज इथेच थांबूया.... 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute