आत्मप्रतिष्ठित आनंदीरमण!

अलीकडेच सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर मराठी याचिका आली तेव्हा त्याचे त्यांनी वाचन हे  मराठीतच करून दाखवले आणि नंतरअमराठींना अर्थ सांगितला,त्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. मराठी भाषा बदलत्या काळात अमृताते पैजा जिंकेल हे नक्की  पण त्यासाठी चंद्रचूडांसारखे सुपुत्र मराठीत असणे गरजेचे आहेत की,  ज्यांच्या  बोलीभाषेत पेशा कायम  ठेऊन मराठी दिसेल. नाहीतर फुटकळ कथा कविता लिहून पुरस्कार धांडोळत बसलेले आणि  कवी केशवसुत म्हणतात तसे  आनंदीरमण काही कमी नाहीत त्याचा ना भाषेला फायदा, ना साहित्याला उपयोग.... 

 राठी भाषेला सुमारे २२०० वर्षांचा दीर्घ इतिहास असून जोडीला अनेक प्रांतिक बोलीभाषांचे  हक्कांचे अधिष्ठानसुद्धा आहे पण असे असूनही मराठी भाषेचा प्रसार म्हणावा तितका झालेला दिसत नाही. आजच्या घडीला मराठी भाषेचे भविष्यात काय होईल हा चिंतेचा मुद्दा वाटत नसला तरी सध्या जे सुरु आहे ते असेच सुरु राहिले तर मराठी भाषा बदलत्या  काळानुसार बदलत्या आव्हानांना तोंड देऊन टिकून राहील का  किंवा या भाषेचा प्रसार वाढवण्यासाठी आतासारखे ढिम्म राहून फक्त एक साहित्य संमेलन आणि एक राजभाषा दिन साजरा केला म्हणजे चालून जाईल का असे विचार करण्यासारखे खूप मुद्दे आहेत. तसे म्हटले तर मराठी भाषा भाग्यवंत म्हणायला हवी कारण या भाषेला बहुरंगी इतिहास लाभला पण तोच वारसा पुढे चालवताना काळानुरूप बदल या भाषेने स्वीकारले नाही, असे निरीक्षण नोंदवता येते. संतकालीन मराठी आणि त्यानंतरचे मराठी यांची सांगड घातल्यास ही  भाषा प्रभावी ठरण्याच्या दृष्टीने  शाब्दिक संपत्तीची एकत्रित भर आणि नवनवीन इतर भाषीय स्वीकारण्याजोगे शब्द मराठीने किती प्रमाणात स्वीकारले हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्याशिवाय मराठीच्या प्रांतिक उपभाषा या त्या त्या प्रांतात जोर धरताना मूळ भाषेच्या समृद्धीसाठी  पूरक ठरण्याऐवजी  स्पर्धक ठरण्याची शक्यता बळावू लागली. कोणत्याही भाषेचा प्रसार व्हायचा आणि समृद्धी व्हायची असेल तर ती जास्तीत जास्त प्रमाणात बोलली गेली पाहिजे आणि वर्षागणिक शब्दसंपत्ती वाढायला हवी. सर्वसाधारणपणे एखादी भाषा बोलता यावी असे वाटत असेल तर  किमान त्या भाषेतील पाच हजार शब्द उत्कृष्टरीत्या माहित असणे आवश्यक असते.. इतर भाषांशी तुलना करता मराठीत उपरोध आणि एक शब्द व त्याच्या वापरावरून बदलते  अर्थ खूप डोकेदुखीचे ठरणारे असल्याने इतर भाषीय ही  भाषा आवडीने शिकण्याच्या भानगडीत पडत नाहीत म्हणण्यापेक्षा त्यांना राहून राहून उघडपणे मराठी बोलण्याची भीती वाटते कारण अर्थ बदलला तर,असा एक समज असतो आपण मात्र अमराठी राज्यात राहून ही भाषा बोलत नाहीत, असे समजतो.
आता हे झाल्यावर मराठी माणूस स्वतः मराठी किती आवडीने बोलतो किंवा समोरचा मराठी बोलावा यासाठी आपला मराठीचा हट्ट किती धरतो, असा एक मुद्दा आहे. आता याचे उत्तर शोधताना लोकलमधील दोन मराठी माणसे किंवा मोठ्या शहरातच नवे तर अगदी छोट्या शहरातसुद्धा एखादी चौकशी करायची तर सर्रास हिंदीतून संभाषणाला सुरुवात  होते.जर मराठी  भाषिक असे करत असतील तर इतरांना कसे दोषी ठरवणार, या घटनांकडे पाहताना थोडे मागे जावे लागेल, देशाच्या स्वातंत्रपूर्व काळात देण्यात आलेल्या ब्रिटिशविरोधी घोषणा आणि  तेव्हापासून  चालत आलेले हिंदी ही  राष्ट्रभाषा नसताना तसा  प्रसार कधी करण्यात आला हे कळलेसुद्धा नाही इंगजीच्या तुलनेत हिंदीने मराठीवर बोलीभाषा म्हणून मोठे आक्रमण केलेले आहे हे वास्तव नाकारता येत नाही. दक्षिणेकडील कानडी, तामिळी, मल्याळम तेलगू या भाषिकांना मानावे लागेल. ते त्यांच्या राज्यात आपल्या मातृभाषेव्यतिरिक्त दुसरी भाषा जवळ करत नाहीत. निदान बोलीभाषेतील त्यांचा हा अभिमान मराठीजनांच्या स्वभावात येणे शक्य नाही. भाषा कोणतीही शिकावी पण ते आपल्या संज्ञापनाचे माध्यम निदान आपल्या प्रांतात तरी बनवू नये हे मराठीजनाना माहित आहे पण हिंदीत उस ...कुछ .. फाडणे किंवा गोऱ्या साहेबाच्या इंगजीची वासलात लावून आय ईट... यु  ईट? सारखे शेंडाबुंधा नसलेले इंग्लिश बोलून आपली प्रतिष्ठा वाढवणारे मराठीजन कमी नाहीत. 
इंग्लिश ही ज्ञानभाषा होण्यामागे खूप वर्षांचा त्याग आणि त्यांच्या वसाहतवादाचा मुद्दा  आहे. त्यांनी विज्ञान,आरोग्य इथपासून ते विविध प्रकारचे कोष आपल्या भाषेत फुलवले. हे सर्व एकाच देशाचे नव्हते. तसे ब्रिटिश, अमेरिकन आणि ऑस्ट्रेलियन इंग्लिश थोड्याफार फरकाने वेगळे आहे पण त्यात खूप मोठी तफावत नाही. त्याचप्रमाणे या भाषेत उपरोध, एका शब्दाचे आवाज किंवा वाक्यातील  वापरावरून अर्थ बदलणे हे प्रमाण खूप कमी आहे. दुसरीकडे  इंग्लिश बोलणे म्हणजे मोठे काहीतरी करणे  हा एक आपल्या  समाजात खूप वर्षांपासून चालत आलेला समज आहे. विद्यार्जनासाठी इंग्लिश शिकणे वाईट नाही  पण आपली  भाषा आपण विसरू  नये. अलीकडेच सत्तासंघर्षाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर मराठी याचिका आली तेव्हा   त्याचे त्यांनी वाचन हे  मराठीतच करून दाखवले आणि नंतर अमराठींना अर्थ सांगितला,त्यात त्यांना कमीपणा वाटला नाही. मराठी भाषा बदलत्या काळात अमृताते पैजा जिंकेल हे नक्की  पण त्यासाठी चंद्रचूडांसारखे सुपुत्र मराठीत असणे गरजेचे आहेत की,  ज्यांच्या  बोलीभाषेत पेशा कायम  ठेऊन मराठी दिसेल. नाहीतर फुटकळ कथा कविता लिहून पुरस्कार धांडोळत बसलेले आणि  कवी केशवसुत म्हणतात तसे  आनंदीरमण काही कमी नाहीत त्याचा ना भाषेला फायदा, ना साहित्याला उपयोग.... मराठीला आता दर्जाशिवाय पर्याय नाही हे सत्य  स्वीकारून पुढील वाटचाल करावी लागणार आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute