कुणी आप्त ना, कुणी सखा ना..... 


 तुर्की तसा  खूप सुंदर आणि चकाचक शहरांचा देश व तेथे सुधारणेस भरपूर वाव आहे पण  भूकंपाच्या आपत्ती झेललेल्या असतानाही आवश्यक त्या संकटांची तीव्रता कमी करण्याचे उपाय शोधण्यात कुचराई झाली असे म्हणता येईल किंवा पाठोपाठ आलेल्या भूकंपातून तुर्की उभे राहू शकला नाही, असेही असू शकेल.  कारण एकदा मोठी आपत्ती आली  की  त्यातून सावरायला कैक वर्षे जातात, हे सत्य नाकारता येत नाही आणि या पेचात तुर्की सापडला  असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे सीरियासमोर देश वाचवण्याचे आव्हान असून तेथे भूकंप झाल्यावर ६० कैदी पळून गेल्याची बातमीही मिळाली आहे. त्यामुळे आधीच अशी घातकी परिस्थिती  असल्याने त्यातून राष्ट्र अशा संकटांचा काय मुकाबला करणार? असा सवाल निर्माण होतो.
---------------------------------------------                     ------------------------------------------------------
र्यावरणाचा ऱ्हास सातत्याने होत राहिला की  त्याला ब्रेक लावण्यासाठी निसर्ग आपल्या परीने विध्वंसक रूप घेऊन प्रयत्न करताना दिसतो, त्यात अनेक निरपराध जीव दगावत असल्याने अशा घटनांचे समर्थन कधीच होऊ शकत नाही आणि त्यामुळेच निसर्गात होत असलेल्या बदलांचा व्यापक अभ्यास करून काय करावे लागेल यादृष्टीने अजून प्रयत्न केले जाण्याची गरज आहे. तुर्की आणि सिरीयात आलेल्या विनाशकारी भूकंपात बळी  पडलेल्याना विनम्र आणि दुःखद अंतःकरणाने आदरांजली वाहून या नैसर्गिक आपत्तीवर चर्चा करुया.. मुळात तुर्की ज्या ठिकाणी वसलेले आहे तो भूभाग जरा धोकादायक असाच आहे त्याचा ९७ टक्के भाग आशियात तर तीन टक्के भाग हा युरोपात येतो तरीही त्याला युरेशिया म्हणतात. शेती, फुले आणि उद्योग हे  या देशाचे खास अर्थार्जनाचे माध्यम,  पण अलीकडे त्याला घरघर लागली. कोरोनापूर्वी देशात अस्थिरतेचे  संकट आले आणि त्यावेळी लष्कर व लोकशाही असा लढा उभा ठाकला. एरवी या देशाची  धर्मनिरपेक्षता  हा वाखाणण्यासारखा मुद्दा होता, पण तो आता राहिला नसून मनमानी सुरु झाली २०१८ मध्ये झालेल्या १८ घटना बदलांनी खूप उद्योग देशाबाहेर गेले आणि तुर्की कमकुवत झाला. अमेरिकेची दोस्ती फक्त गरजेपुरती कागदावर  राहिली व अडचणी आणि वाढल्या.  कोरोनातून सावरत असतानाच आता हे नवे १०० वर्षातील सर्वात मोठे संकट उभे ठाकल्याने त्यातून सावरणे सोपे असणार नाही. तिकडे सीरियाचे म्हणाल तर अर्धा अधिक भाग बंडखोरांच्या ताब्यात असून आता आलेल्या भूकंपामुळे तिथेही मोठी हानी झाली आहे. युद्ध व स्फोट यात घाबरून जगणाऱ्या सिरियाच्या नागरिकांना आता या भूकंपाने सर्व  बाजूनी हतबल केले असे म्हणता येईल. 
पहाटे साखरझोप सुरु असताना भूमंडळ डळमळू लागले व जवळपास ३ ते ४ हजार इमारती पूर्ण कोसळल्या. मदत व बचावकार्य सुरु झाले पण कुणाचे आप्त गेले, कुणी एकटे उरले तर कुणी अजून बेपत्ता आहे. रडायला उसंत नाही कारण उद्याचा काळ कसा असेल याची भीती येथे अधिक आहे.  त्यात अधूनमधून डळमळ होते आणि पुन्हा जीव घाबरतो अशी  करूण  कहाणी प्रत्याक्षदर्शी सांगतात. ढिगाऱ्याखालून कुणी जिवंत निघाले, त्यात दोन बालके आणि ढिगाऱ्याखाली प्रसूती होऊन जिने एका गोंडस मुलाला जन्म दिला, ती माता जेव्हा जेव्हा ढिगाऱ्याखालून बाहेर आली तेव्हा त्याला  पोटाळ्त घाबरून रडू लागली. परिस्थिती खूप भयावह दिसत होती पण इलाज नव्हता. हजारो बळी  या भूकंपाने घेतले आणि कैक संसार उध्वस्तही  केले  आता अश्रूही आटलेत  अशी अवस्था झालेली  आहे. 
तुर्कीमध्ये १९३९नंतरचा  हा सर्वात मोठा भूकंप असल्याचे सांगण्यात येत आहे.पण मग जपानमध्येही भूकंप  येऊन हानी झाल्याच्या घटना घडलेल्या  आहेत पण त्यांनी त्यावर संकटाची तीव्रता कमी करण्यासाठी  उपाय योजलेले दिसतात मग तुर्कीच्या सरकारला हे का जमू नये हा सवाल आहे आणि त्याचे उत्तर शोधताना तुर्कीची शक्ती राजकीय स्थिरता शोधण्यात अधिक खर्च होते की  काय या मुद्द्यात दडलेली आहे. तुर्की तसा  खूप सुंदर आणि चकाचक शहरांचा देश व तेथे सुधारणेस भरपूर वाव आहे पण  भूकंपाच्या आपत्ती झेललेल्या असतानाही आवश्यक त्या संकटांची तीव्रता कमी करण्याचे उपाय शोधण्यात कुचराई झाली असे म्हणता येईल किंवा पाठोपाठ आलेल्या भूकंपातून तुर्की उभे राहू शकला नाही, असेही असू शकेल.  कारण एकदा मोठी आपत्ती आली  की  त्यातून सावरायला कैक वर्षे जातात, हे सत्य नाकारता येत नाही आणि या पेचात तुर्की सापडला  असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे सीरियासमोर देश वाचवण्याचे आव्हान असून तेथे भूकंप झाल्यावर ६० कैदी पळून गेल्याची बातमीही मिळाली आहे. त्यामुळे आधीच अशी घातकी परिस्थिती  असल्याने त्यातून राष्ट्र अशा संकटांचा काय मुकाबला करणार? असा सवाल निर्माण होतो. 
आता हे सर्व झाल्यावर तुर्कीच्या भागातच असे भूकंप का होतात हा मुद्दा येतोच. पृथ्वी टेकटोनिक प्लेट्सवर असून  त्याच्याखाली लाव्हा रस आहे. या प्लेट्स तरंगत असतात पण जेव्हा त्या एकमेकांवर आदळतात तेव्हा त्या वाकत  असाव्यात आणि त्या मोडल्यास त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडण्यास लाव्हा रसाच्या रूपात ऊर्जा मोठ्या प्रमाणावर बाहेर  पडून मग धरणी कंप  पावू लागते हा मुद्दा विचारात घेतला तर मग तुर्कीची भौगोलिक अवस्था लक्षात घेतली पाहिजे. हा देश अनातोलियन टेकटोनिकवर बऱ्याच प्रमाणात वसलेला असून त्याच्या प्लेट्स युरेशियन, आफ्रिकन आणि अरेबियन भागात आहेत व  त्यांची हालचाल होऊन मग तुकडे पडू लागतात आणि असे भूकंप होतात. सर्वसाधारणपणे जेव्हा ७. किंवा त्या आसपास तीव्रतेचा भूकंप होतो तेव्हा इमारती पत्याच्या  बंगल्यासारख्या कोसळतात. भूकंपाची तीव्रता १ रिश्टर स्केलने वाढली की  त्याची क्षमता  ३२ पट अधिक असते आणि हजारोंच्या क्षमतेने ऊर्जा बाहेर पडते पाकिस्तानमध्ये झालेला २०१३ चा भूकंप आणि तुर्कीचे पाहिले  तर १९३९ चा भूकंप हा असाच विनाशकारी होता. आता हे सर्व झाल्यावर पाच किंवा त्यापेक्षा कमी रिस्टर स्केलचे धक्के दिल्ल्ली व आसपासच्या भागात अधूनमधून बसताना दिसतात.  या साऱ्या घटना पाहिल्यावर एक लक्षात येते की,पृथ्वीच्या पोटात  काहीतरी गडबड सातत्याने होत असून त्यावर अजून व्यापक संशोधन करण्याची गरज आहे.  
वाढते तापमान, बिघडते पर्यावरण आणि निसर्ग चक्रांचे  पडत असलेले  उलटे फेरे त्याचाच हा एक भाग आहे का? किंवा अशा धोक्यांची पूर्वसूचना आपल्याला हमखास कशी मिळू शकेल? त्यासाठी काय करता येईल हे महत्त्वाचे असून संकटे पूर्णपणे थोपवता येत नसली तरी त्याची तीव्रता कमी करणे मानवाच्या हाती नक्कीच आहे आणि या भूकंपातून धडा घेऊन तुर्कीनेसुद्धा आता येणाऱ्या काळात पुनर्वसनाचा आराखडा तयार करत असताना जपान व अन्य राष्ट्रांचे तंत्र समोर ठेवणे गरजेचे आहे. शेवटी महापूर, चक्रीवादळ आणि भूकंप अशी नैसर्गिक संकटे जीवित आणि वित्तहानी अशी काही करून जातात की  त्यातून पटकन सावरणे कुणालाच शक्य नसते. तेव्हा अशावेळी मानवता, प्रेम हेच खरे धर्म उरतात कारण ते जगात कुठेही आणि कधीही अडचणीत उपयोगी पडतात. संकटात कुणी आप्त ना, कुणी सखा ना, अशी अवस्था होऊन दिशा हरवलेले जीव पुढचा मार्ग शोकात बसतात कारण दुसरे करणार तरी काय? कोण कुणाचे अश्रू पुसणार आणि कोण कुणाला किती आणि कशाच्या भरवशावर धीर देणार हा प्रश्न असून त्याचे उत्तर सापडणे या भूकंप प्रलयात तरी कठीण वाटते. 
                                                                                                                 -मिलन तेंडुलकर 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute