आठवणीतील शिमगोत्सव 

शिमगोत्सवाची प्रत्येक गावची परंपरा आणि रूढी वेगवेगळ्या आहेत. पण तरीही झांजये ,टिपरी आणि डफये असे खेळे आढळतात. प्रत्येकाची गाणी आणि नाचण्याची पद्धत वेगळी असल्याने ते पाहण्यास खूप मजा येते. शिव ...पार्वती.. गजानना .., सीतामाय बोलते रामा ओ भरतारा ..एवढा मृग मारावा माझ्या ओ चोळीला, ही झानजी वाजवणाऱ्या खेळ्यांची गाणी असत. तर ये ग ये ग विठाबाई , संत तुकाराम भक्त संत तुकाराम, प्रिय अमुचा देव प्रिय अमुचा, यासारखी गाणी म्हणत टिपरी खेळे पेरणी लावून नाचू लागले की तो खेळ पाहण्यास खूप मजा येत असे. डफये  खेळे  याहून वेगळे आणि त्यांची वेशभूषा इतकी झक्कास की  ती डोळे मिटल्यावरही समोर दिसावी आणि गाणी तर लाजवाब कारण त्यात  प्रश्नोत्तरे असतात.जसे की, पांडवांचे  घरी मांडिले  सहस्रभोजन .देशोदेशीचे राजे निघाले होते कोण कोण? अशी काही गाणी आहेत. 

कोकणात शिमगोत्सवाची धामधूम सुरु झाली आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कोकणी माणूस तसा पहिला तर  उत्सवप्रिय, त्यामुळे प्रत्येक सण साजरा करण्यास तो कमी पडणे शक्यच नाही.बदलत्या काळानुसार आता उत्सवांचे स्वरूप बदलत चालले आहे आणि वाढत्या वयानुसार बदललेल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी गाव सोडण्याशिवाय पर्याय राहिला नसल्याने प्रत्येक सणाला गावी जाणे पूर्वीसारखे शक्य होत नाही पण कधीकधी आठवणींना पंख फुटतात आणि मन भूतकाळातील रम्य आठवणीत  दंगून जाते . नव्वदीच्या काळात साजरा होणारा आमच्या गावाकडील शिमगा नजर लागावी असाच होता. नमन खेळे, पालख्या, होळी नाचवून फाका मारणे यात टवाळखोर आघाडीवर असायचे. फाल्गुन नवमीला अंगणासमोरील मांडवात शेणाचे सारवण पडायचे, त्यावर रांगोळी पडली की शिमग्याची चाहूल लागत असे. शाळा सकाळीच असल्याने आणि त्यावेळचे शिक्षक कलाप्रेमी असल्याने खेळे शाळेतही बोलावून नाचवले जात असत. दुपारच्या मोकळ्या वेळात पालख्या आणि इतर खेळे पाहायला मिळायचे.परीक्षा तोंडावर आलेल्या असायच्या पण त्याची विवंचना त्या वयात वाटत नसायची.आमच्या वर्गातील बरेचसे सवंगडी नमन  खेळात काम करत असत. त्यात कुणी कृष्ण, तर कुणी गवळण अथवा मिळेल ते काम करत असत. आम्हाला या साऱ्याची मोठी अपूर्वाई होती कारण आजच्यासारखे टीव्ही आणि मोबाईल आमच्या बालपणी खेडोपाडी फोफावलेले नसल्याने मनोरंजनाची साधने मर्यादित होती.
 एकादशीला गावचे सत्येश्वर व जाखादेवीचे  खेळे बाहेर  पडले की  शेजारच्या गावातून एकेक मेळ येऊ लागायचा.त्यात भडेकर  पहिले आणि मग दाभिळ, खानवली , वाघ्रट, हसोळ, गावखडी येथून खेळे येत असत. एखाददुसरा तमाशा आणि दोन-तीन पालख्या असा शिमगोत्सव साजरा होत असे.शिमगोत्सवाची प्रत्येक गावची परंपरा आणि रूढी वेगवेगळ्या आहेत. पण तरीही झांजये ,टिपरी आणि डफये असे खेळे आढळतात. प्रत्येकाची गाणी आणि नाचण्याची पद्धत वेगळी असल्याने ते पाहण्यास खूप मजा येते. शिव ...पार्वती.. गजानना .., सीतामाय बोलते रामा ओ भरतारा ..एवढा मृग मारावा माझ्या ओ चोळीला, ही झांजी  वाजवणाऱ्या खेळ्यांची गाणी असत. तर ये ग ये ग विठाबाई , संत तुकाराम भक्त संत तुकाराम, प्रिय अमुचा देव प्रिय अमुचा, यासारखी गाणी म्हणत टिपरी खेळे पेरणी लावून नाचू लागले की तो खेळ पाहण्यास खूप मजा येत असे. डफये  खेळे  याहून वेगळे आणि त्यांची वेशभूषा इतकी झक्कास की  ती डोळे मिटल्यावरही समोर दिसावी आणि गाणी तर लाजवाब कारण त्यात  प्रश्नोत्तरे असतात.जसे की, पांडवांचे  घरी मांडिले  सहस्रभोजन .देशोदेशीचे राजे निघाले होते कोण कोण? अशी काही गाणी आहेत. नमन पाहणे हा त्याकाळचा खूप मोठा कार्यक्रम असे.वाडीवर नमन असले आणि त्याची  माहिती मिळाली की बॅटऱ्या घेऊन चांदण्यातून लवाजमा बाहेर पडत असे...योग्य जागा सतरंजी अंथरून अडवून ठेवणे हे काम लहान पोरे किंवा म्हाताऱ्या बायकांना करावे लागत असे. गण, गवळण वगनाट्य अशी नमनाची रचना असते.त्यावर सविस्तर चर्चा कधीतरी नक्की करू..त्याचप्रमाणे पालखी नाचवणे ही  शिमग्याची खासियत असून देव या माध्यमातून खेळतात किंवा भक्ताच्या खांद्यावर विसावून शेजारच्या गावात रपेट मारून येतात, असे सांगितले जाते. त्यातील काही पालख्या खुणा शोधून काढतात आणि  हा सोहळा पाहण्यालायक असतो.शिमग्याची फाक हा एक रंजक मुद्दा आहे.हुरा रे हुरा आणि आमच्या भैरीबुवाचा सोन्याचा तुरा रे होलयो ... तसेच धुक्कट रे धुक्कट आणि अमुकतमुक याचा जीव फुकट रे होलयो ..अशा फाका  मारतात काही ठिकाणी अश्लील फाका पूर्वी मारल्या जायच्या जेणेकरून स्त्रियांना लज्जा वाटेल. पण आता ते प्रकार बंद झालेत.त्याशिवाय होळी म्हणून आंबा, सुरमाड, फोपळ, शिवर , केळ माड आदी वृक्षांची कत्तल केली जाते. जिल्ह्यात हजारोनी वृक्ष नाहक बळी  जातात हे काळानुरूप थांबायला हवे. पण विकासाच्या नावाखाली आणि सणाचे निमित्त देऊन बेसुमार झाडे तोडण्याची ही  सवय जुनी असल्याने ती थांबणे शक्य वाटत नाही. एरवी रिफायनरी किंवा इतर प्रोजेक्ट कोकणात येऊ लागतात तेव्हा पर्यावरणास ते घातक आहेत असे सांगणारे, वृक्षतोड थांबवा नाहीतर कोकणचा कोलोरॅडो होईल असे का सांगत नाहीत की  त्यांना गठ्ठाभर मते मिळणार नाहीत याची भीती वाटते काही कळत नाही. तेव्हा अशा पद्धतीने कोकणचा शिमगा साजरा होत असतो. होळीच्या होमात नारळ टाकून नवीन जोडपी आशीर्वाद घेतात आणि देवदेवता त्यांना पावतातही असे सांगितले जाते. युगानुयुगे चालत आलेला हा शिमगा यावर्षीही सुरु असून त्याचा आनंद  लुटण्यासाठी कोकणात जरूर या....

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute