Political rallies blog

 सभा जाहल्या उदंड! 

कोकणातच नव्हे तर राज्यात कुठेही सर्वपक्षीय राजकीय  सभांचा शिमगा निवडणुका नसतानाही सुरू राहिला तर सामान्य मतदार उबगणार आणि त्यातून निरुत्साही मतदार मतदानाकडे पाठ फिरवणार,त्याला जबाबदार कोण? यावर आतापासूनच गंभीरपणे विचार करण्याची गरज असून निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना विनाकारण सभा घेऊन सामान्यांचे डोके उठवण्यापासून रोखले पाहिजे.

अवकाळी पावसाचा धमाका राज्यात सुरू असतानाच राजकीय नेते तरी त्यात कमी कसे पडतील?ऐन शिमग्यात सणासुदीचा विचार खुंटीला टांगून कोकणात  कुणी शिवगर्जना तर कुणी उत्तर सभा घेऊन आरोप- प्रत्यारोप करत सुटले.आपापले समर्थक विविध भागातून जमा करून शक्तिप्रदर्शन करताना कोकणवासियांचा आपल्यालाच कसा आशीर्वाद हे तावातावाने सांगण्यात आले पण सत्य हे आहे की,सामान्य कोकणी माणसाला यापैकी कुणामध्ये काहीही स्वारस्य उरलेले नाही.'रात्रंदिन आम्हा पोटापाण्याचा विचार...पुरेसा पैसा हाती येईना..'अशी कोकणातल्या राबत्या हातांची अवस्था असताना, त्याचे भान ठेवून निदान आजवर ज्या कोकणने भरभरून दिले त्या कोकणी माणसाला किंवा अडचणीत असलेल्या राज्यातील बळीराजाला, सभेसाठी नाहक उधळपट्टी करण्याऐवजी  मी माझ्या खिशातून चार पैसे  देणार आहे असे सभावीरांपैकी कुणीच म्हणायला तयार नाही.सध्या निवडणूका नसल्याने शेतकरी,कष्टकरी यांना जगवण्यासाठी चार पैसे मदतीचा हात एखाद्याने स्वतःच्या खिशातून  दिला असता तर काही बिघडले नसते. कोकणात आलेल्या या सभावीरांपैकी एकजण म्हणतात,'माझे वडील चोरले,पक्ष चोरला आणि गद्दारांना ५० खोके मिळाले.माझ्याकडे आता तुम्हाला देण्यासारखे काही नाही'. तर दुसरे सभावीर मि.कुल,बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढे निघालेले आहेत.त्यांच्याकडे महाशक्तीचे पाठबळ आहे.त्यामुळे ते बंजारा समाजापासून ते अगदी कोकणवासियांपर्यंत सा-यांना हे करणार ते करणार वैगेरे सांगतात.मंडणगडमध्ये एमआयडीसीपासून ते कोकणातल्या माणसाला कोकणात रोजगार देण्यापर्यंत सुरेख मुद्देही त्यांनी मांडले, वास्तवात  हे सर्व कधी सत्यात उतरायचे तेव्हा उतरू दे पण आताच्या घडीला मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार आणि कोकणी माणसाला त्याच्या श्रमाचा पुरेपूर मोबदला कधी मिळणार?हे दोन मोठे डोकेदुखी ठरणारे प्रश्न आहेत.कोकणच्या माणसाचे दरडोई उत्पन्न वाढले पाहिजे आणि त्याला कामाच्या ठिकाणी सुरक्षा कवच मिळाले पाहिजे...त्यासाठी काय करणार आहात?याचे उत्तर खेडमध्ये ऐन शिमग्यात अवतरलेल्या एक सत्ताधारी आणि एक सत्ता गमावलेल्या सभावीरांनी काही ठाम शब्द दिला नाही. या दोन सभांवर लक्ष टाकल्यास एक जाणवते की, दोघांचे उद्दिष्ट एकच आणि ते म्हणजे शक्तिप्रदर्शनाच्या माध्यमातून आपआपल्या पक्षाची ताकद अजमावणे आणि त्यानंतर निवडणूकीपूर्वी डावपेच आखून पुढच्या आव्हानाला सज्ज होणे.आपआपला पक्ष वाढवण्यासाठी सभा घेणे,किंवा एकमेकांचे मुद्दे खोडून काढणे यात वावगे वाटण्याचा प्रश्नच नाही.पण निवडणुका दृष्टीपथात नसताना कोणत्यातरी गोंडस नावाखाली अभियान सुरू करायचे आणि तेच तेच मुद्दे घेऊन आरोप करायचे व एकाने आरोप केला म्हणून दुसऱ्याने त्याचठिकाणी हट्टाने सभा घ्यायची आणि सुरक्षा यंत्रणांना कामाला लावायचे यात कसले आलेय जनतेचे हित? हे असे चक्र राज्यभर सुरू झाले तर समस्या मार्गी लागण्यापेक्षा या नव्या राजकीय ड्राम्याला कंटाळून जनता जेव्हा निवडणूक प्रचारसभा सुरू होतील तेव्हा काहीच नाविण्य उरले नसल्याने मतदान करण्याबाबत किती उत्साही असेल,याबाबत साशंकता व्यक्त करण्यास भरपूर वाव आहे.अलिकडेच झालेल्या राज्यातील पोटनिवडणुकीत मतदार निरुत्साही होते,त्यातले एक कारण होते राजकारणाचा अतिरेक आणि आरोप प्रत्यारोप.आता कोकणातच नव्हे तर राज्यात कुठेही हा सर्वपक्षीय राजकीय  शिमगा निवडणुका नसतानाही सुरू झाला तर सामान्य मतदार उबगणार आणि त्यातून निरुत्साही मतदार मतदानाकडे पाठ फिरवणार,त्याला जबाबदार कोण? यावर आतापासूनच गंभीरपणे विचार करण्याची गरज असून निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना विनाकारण सभा घेऊन सामान्यांचे डोके उठवण्यापासून रोखले पाहिजे.अभियान,संवाद यात्रा किंवा मार्गदर्शनपर सभा कार्यकर्त्यांसाठी बंद सभागृहात घेतली गेली तर अधिक उत्तम, पण  अर्ज भरण्यापासून ते इतर प्रत्येक बाबतीत शक्तिप्रदर्शनाची कार्यकर्त्यापासून ते पुढा-यापर्यंत सा-यांना इतकी सवय झालेली आहे की त्यांना असा कुणी सुजाण मार्ग सुचवला तर बावळटपणा वाटण्याची शक्यता अधिक.आपण करतो ते सर्व चांगले, असा एकदा  समज झाला की,समोरून सूचना करणारे आपल्या वाईटावर उठलेले आहेत असा समज राजकारणात खूप खोलवर रुजलेला आहे.आता राजकीय ईर्ष्या आणि स्पर्धा वाढल्याने गडचिरोलीपासून ते कोकणापर्य॔त सभेचे पेव असेच फुटेल.रत्नागिरीचे खेडवासिय तसे भाग्यवान कारण फाल्गुन महिन्यात त्यांचे मनोरंजन झक्कास झाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण कोकणला काय दिले ते त्यांना वाटणा-या गद्दारांवर टीका करत त्यांनी सांगितले.त्या मेळाव्यात भास्कर जाधव, अनंत गिते,सुषमा अंधारे आदी एकनिष्ठतेच्या व्याख्येत बसणा-या अनेक नेत्यांनी विरोधकांवर तोंडसुख घेतले.त्यानंतर उत्तर सभेत रामदास कदमांसह शिंदेच्या एकनिष्ठतेच्या व्याख्येत बसणा-या  नेत्यांनी एकेकाळचे आपले पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची संधी साधली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या शिलेदारांच्या सूरात सूर मिळवला,जोडीला कोकणसाठी अनेक विकासाच्या योजनाही जाहीर करून टाकल्या.त्यातील किती पूर्णत्वास जातील तो भाग निराळा, जोडीला आपण देणारे आहोत हा परंपरागत आपला डायलाॅगही पुन्हा ऐकवला.दोन्ही सभांना चांगला प्रतिसाद मिळाला पण त्या गर्दीतले कोण कुठल्या भागातून आले होते,याचा विचार केल्यास गर्दीतला फोलपणा चतूर विश्लेषकांच्या ध्यानी यावा. दोन्ही बाजूंच्या सभा पार पडल्या...दोघांचे समाधान झाले, सभेवर कुणी किती उधळले? असले प्रश्न आपल्या देशात कुणाला पडत नाहीत,ही राजकीय  पक्षांची मोठी पूर्वपुण्याई म्हणावी  लागेल, नाहीतर पाश्चात्य देशात या मुद्द्यावरूनसुध्दा जनता अद्दल घडवायला मागेपुढे पाहत नाही.असो, राज्यात सभाचक्र सुरू झालेले आहे ते येणा-या काळात उदंड आणि अविरत सुरू राहिल,त्यातून कुणाचे भले होईल ते काळालाच ठाऊक!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute