Gudhipadwa blog

 पाडवा गोड होतोय ...

पाडव्याचे दुपारचे जेवण तयार झाल्यावर सुरूवातीला का...का...का... करून  ठेवलेल्या वाडीसाठी घरातील कर्ता पुरूष कावळयांना साद घालत असे. मग कावळ्यांची झुंब्बड उडायची आणि वाडी घेऊन पूर्वज समाधानी होत असत.त्याकाळात बिनधास्त पिणारी मंडळी असल्याने तोंडाची वाफ दवडण्याइतपत वाद व्हायचे.रात्री मांडावर नमन होत असे.प्रत्येक गावात पाडव्याच्या रात्री मृदंगावर थाप मारून नव्या वर्षाची सुरुवात केली जायची.

गुढीपाडवा...मराठी नववर्षाची सुरूवात आणि साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त...या सणाची धार्मिक पार्श्वभूमी सर्वज्ञात आहे. त्यामुळे त्यावर वेगळी चर्चा करण्याची गरज वाटत नाही.अशा विविध सणांच्या माध्यमातून शेअर बाजार तेजीत येण्याबरोबरच आर्थिक उलाढाल वाढल्यास त्याचे आणखी अनुकूल परिणाम भविष्यात दिसू शकतात. यासारख्या अनेक अपेक्षांच्या आणि आठवणींच्या गुढ्या उभ्या राहिल्या की मन भूतकाळात रमते व एकेक करून  विविध घटना डोळ्यासमोरून सरकत जातात...शिमगा, पाडवा हे सण खरे म्हणाल तर उत्साहाचे, पण त्याचवेळेस वार्षिक परीक्षा डोके वर काढतात आणि एकीकडे आनंद व दुसरीकडे टेन्शन अशी दुहेरी अवस्था विद्यार्थी दशेत जीव कासावीस करते.पुर्वीपासून चालत आलेले हे चित्र अजूनही कायम आहे,हीच काय ती समान बाजू.कोकणात सणांची कमी नाही पण सण साजरे करणाऱ्यांची पंचाईत मोठी आहे.गावाकडे रोजगार नाही म्हणून पोटाच्या पाठी कोण किती दूरवर गेलेला असेल ते माहित नाही आणि नेहमी गावी येणे जमत नसल्याने मग पूर्वापारपासून चालत आलेले सण समारंभ गावातील ज्येष्ठ मंडळी थरथरत्या हाताने जमेल तसा साजरा करतात.
आमच्या बालपणीचा गुढीपाडवा खूप उत्साहात पार पडत असे.सकाळपासून त्याची लगबग सुरू होत असे.शेतातच गोंड्याच्या फुलांची लागवड केलेली असल्याने ती तोडून आणून जोडीला लाल चाफ्याची फुले टाकून झक्कास माळ तयार होत असे.चकाकणारा गडू आणि त्याला साजेसा रंगीत कपडा लावून गुढी स्वागतासाठी उभी रहायची. जिलेबीची ऑर्डर देणे किंवा पुरणपोळी,श्रीखंड अथवा जे काही गोड असेल ते करून नैवेद्य दाखवून जेवण आटोपत असे. काही ठिकाणी हा तिखट सण असल्याने खूप गडबड व्हायची.आजच्यासारखे मिक्सर सेवेला नसल्याने कांदा व खोबरे चुलीत भाजून आणि मसाला एका ताटात घेऊन तो पाट्यावर वाटण्यासाठी एका घरातील तीनचार बिऱ्हाडांची धांदल उडायची.पाटा एकच असल्याने पटापट वाटण करावे लागायचे.पुर्वी कोंबडे कापणे व जेवण बनवणे याचे मोठे नियोजन आठवडाभर आधीच करावे लागत असे. त्यातच बोकड आणायचा झाल्यास त्याचे आणखी दुप्पट नियोजन असायचे. कारण बोकड विकत आणून तो कापून त्याचे वाटे घरोघरी पोचवेपर्यंत खूप वेळ जातो.
अशा प्रकारे पाडव्याचे दुपारचे जेवण तयार झाल्यावर सुरूवातीला का...का...का... करून  ठेवलेल्या वाडीसाठी घरातील कर्ता पुरूष कावळयांना साद घालत असे. मग कावळ्यांची झुंब्बड उडायची आणि वाडी घेऊन पूर्वज समाधानी होत असत.
त्याकाळात बिनधास्त पिणारी मंडळी असल्याने तोंडाची वाफ दवडण्याइतपत वाद व्हायचे.रात्री मांडावर नमन होत असे.प्रत्येक गावात पाडव्याच्या रात्री मृदंगावर थाप मारून नव्या वर्षाची सुरुवात केली जायची. घुग-या खाणे,दिवट्या पेटवून गोंधळ घालणे,नवस बोलण्याची किंवा फेडण्याची गा-हाणी घातली जात.मुलांना काही आजार वा इतर त्रास असेल तर पालखी अथवा खेळे त्याचा ओलांडा काढत असत,त्यानंतर ते मूल व्यवस्थित झाल्याची कितीतरी उदाहरणे जुनेजाणते सांगतात.पाडव्याच्या मध्यरात्री भडे गावी खेळे रसरसत्या निखा-यात बिनधास्त नाचतात. एकिकडे अंगाची लाहीलाही करणाऱ्या वातावरणात चक्क निखा-यात उडया मारणे हे खाण्याचे काम नाही. पाडव्याचा दिवशी असे खूप कार्यक्रम असायचे.
आता हा काळ मागे पडत चालला आहे.खूप सुधारणा झाल्यात आणि त्याला कुणाचा विरोध असण्याचे कारणही नाही पण त्यामुळे माणूस एकत्र यायचा कमी झाला असून घरात शिरायचे...दरवाजा बंद करून टीव्ही लावून किंवा मोबाईलमध्ये मान घालून बसायचे,इतकाच काय तो दिनक्रम, ही खरी समस्या आहे.मग सण असो की आणि काही, फरक पडताना दिसत नाही.
पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शिळा पाडवा घेऊन माहेरवाशीण यायच्या.त्यावेळचे ते वडे आणि सुके मटण आजही लक्षात आहे कारण त्याची चवच वेगळी असायची.आता सण आणि त्यासाठीच्या स्वयंपाकाच्या पद्धती बदलत चालल्याने पुर्वीसारख्या चविष्ट जेवण बनवणा-या सुगरणीही कमी झालेल्या आहेत.ओल्या काजूची उसळ किंवा लाल मिरची लावून तयार केलेली फणसाची भाजी हे मागे पडत चालले.त्यातच नोकरीनिमित्त गाव सुटल्याने अनेक सण दुरावत गेले.आता त्याची माहीती फोनवर मिळते आणि प्रत्येक सणाला प्रतिवर्षी काहीतरी कमी झाल्याचेही जाणवते.बालपणी वार्षिक परीक्षा आणि तरूणपणी कामधंदा सणांवर बोळा फिरवतोय, ही प्रत्येक कोकणवासियाची कैफियत असून तनाने नाही तरी मनाने का होईना पण गावचा प्रवास अशा प्रसंगी घडतो.स्वच्छ अंगणाच्या मांडवातून उंच डोकावणारी गुढी डोळ्यासमोर येते... जुन्या आठवणींनी पापण्यांच्या कडा ओलावतात व कुणी पाहत नाही याची खात्री करून त्या पुसतानाच मी स्वतःशीच पुटपुटतो, पाडवा गोड होतोय ..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute