Blog on MNS

 संघर्षाची सतरा वर्षे! 

पक्ष कोणताही असो,त्याला आपल्याला सत्ता मिळावी अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे पण त्या मार्गाने वाटचाल करताना  उत्तम वक्तृत्व शैलीबरोबरच उपलब्ध संधी,गरजेनुसार तडजोड आणि आकड्यांचे गणित यातही पारंगत असणे आवश्यक असते.सामान्यजन याला लबाडी म्हणतात तर राजकीय भाषेत त्याला चतुराई म्हणतात. राज यांच्यासारख्या परखड नेत्याला हे जमेल का? हे महत्त्वाचे आहे.


माझे स्वतःचे काहीतरी आहे, मी स्वतः काहीतरी निर्माण केले आणि मी कुणाच्या पुण्याईवर जगत नाही हे सांगताना वाटणारा अभिमान त्या व्यक्तीच्या जागी आपण आहोत अशी कल्पना केली तरी थोड्याबहुत प्रमाणात जाणवतो.राज ठाकरे यांची मनसे आता सतरा वर्षांची झाली, हा सतरा वर्षांचा कालावधी पूर्ण संघर्षातच गेला. संघर्षाशिवाय सत्ता मिळत नाही आणि जनतेच्या समस्या आंदोलनाशिवाय सुटत नाहीत पण नुसती आंदोलने करत राहण्यासाठी पक्षाचा जन्म कुणालाच परवडणारा नाही. शिवाय कार्यकर्ते तरी किती केसेस अंगावर झेलतील? हा प्रश्न असतो.अशावेळेस पक्षाच्या मुख्य  नेत्यालाच आपली पुढची दिशा ठरवावी लागते. हे लक्षात घेता सध्याची राजकीय परिस्थिती मनसेला अनुकूल आहे का? याचे उत्तर शोधताना मनसेच्या जमेच्या बाजू आणि अजून काय करणे त्यांच्यासाठी महत्त्वाचे आहे याचा आढावा कुठल्याही टीकेचा सूर न लावता घेता येईल. मनसेची डॅशिंग कामाची पद्धत अनेकदा यशस्वी झाल्याचे दिसून येते पण त्याचवेळेस पक्षाची परिपूर्ण बांधणी, व्यापक आणि व्यक्तिगत जनसंपर्क ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांचे अल्प प्रमाण,सोशल मीडियाचा जनसामान्यांपर्यंत झटक्यात पोचण्यासाठी प्रभावीपणे वापर होण्याचे प्रमाण कमी असणे शिवाय सर्वसामान्य माणसाचा, समस्या घेऊन गेल्यास कार्यकर्ते नेमके कसे रिअॅक्ट होतील, याबाबत असलेला संभ्रम अशी काही उणीवा दर्शवणारी कारणे सडेतोड  विचारधारा असतानाही पक्षाच्या पेटीत मत पडताना अडसर ठरतात आणि त्यामुळेच राज यांच्या भाषणाकडे लोक विनोद म्हणून पाहतात किंवा संपत चाललेल्या पक्षावर मी बोलत नाही असे हिणवण्याची संधी विरोधकांना मिळते. अर्थात राजकारणात कुणी संपत नसतो तर एखाद्याचे बरेवाईट दिवस येत असतात.लालूप्रसाद चारा घोटाळ्यात सापडले तेव्हा राजद संपला,असे वाटून भाजपसोबत त्यावेळेस सत्ता भोगणारे नितीशकुमार खूश झाले होते पण काळाचा महिमा अगाध असतो,आता नितीशकुमारांना भाजपची साथ सोडून राजदच्या तेजस्वीसोबत सत्ता थाटावी लागली आहे.
आता हे सर्व झाल्यानंतर मनसेसाठी येणारा काळ कसा असेल,हे लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे.पक्ष विस्तारासाठी सभा घेणे इतपत ठीक पण निवडणुका तोंडावर आलेल्या असतानाच कमी वेळेत गावागावात पक्ष खोलवर रूजवणे आणि महागाई तसेच राज्यातील राजकीय गढूळ वातावरणात आपला पक्ष काय करू शकतो?हे घरोघरी जाऊन पटवून सांगणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज तात्काळ उभी करणे आवश्यक आहे.तसे हे थोडे आव्हान आहे कारण सध्या राज्यात अशी परिस्थिती आहे की, सर्व राजकीय पुढारी सारखेच वाटतात.मग अशावेळेस आपण आणि आपला पक्ष कसा वेगळा हे मनसेला आता दाखवून देण्याची गरज आहे.
मनसेच्या वर्धापन दिनी राज ठाकरे यांचे विविध मुद्द्याला स्पर्श करणारे भाषण नेहमीप्रमाणे तडाखेबंद असले तरी उद्धव ठाकरे यांच्यावर रोख ठेवणे आता यापुढे पूर्वीप्रमाणे प्रभावी ठरण्याची शक्यता कमी वाटते.उलटपक्षी केंद्र सरकार,राष्ट्रवादी,भाजप आणि शिवसेना यांच्या धोरणावर त्यांना आणखी हल्ला करून त्यातील फोलपणा जनतेसमोर आणावा लागेल. पक्ष आणि चिन्ह हातचे गेल्यावर सहानुभूती मिळवू पाहणाऱ्या उद्धव ठाकरे यांना रोखण्यासाठी सत्य मांडण्याचा प्रयत्न म्हणून टीकात्मक बोलण्याइतपत ठीक आहे पण हिंदुत्व किंवा दुसऱ्या पक्षीय नेत्यापुरतीच टीका केंद्रीत करून फार काही हाती लागत नाही,हे राज यांना आजवरच्या अनुभवातून नक्कीच उमजले असेल.एरव्ही एकनाथ शिंदे यांना अलिबाबा संबोधून उत्तर सभा घेत फिरण्यापेक्षा शेताच्या बांधावर जाण्याचा आणि राज्याच्या जनतेच्या समस्येवर काम करण्याचा दिलेला सल्ला स्वागतार्हच आहे. मेळाव्याआधीच्या एका भाषणात राज ठाकरे यांनी राज्यात सुरू असलेली राजकारणाची पद्धत आणि सततच्या सभा यामुळे महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश किंवा बिहार होण्याची व्यक्त केलेली भीती असो किंवा मेळाव्यात बोलताना, पुर्वी महाराष्ट्र इतरांचे प्रबोधन करायचा पण आता महाराष्ट्राचे प्रबोधन करण्याची वेळ येतेय की काय असे म्हणणे असो ही दोन्ही विधाने वास्तव सांगतात पण त्यावर उपाय सुचवताना मध्यमवर्गीय माणसे राजकारणातून लोप पावत चालली असल्याची त्यांची खंत व्यर्थ वाटते.याचे कारण म्हणजे सध्या तिकीटवाटप करताना लावले जाणारे पक्षीय निकष तसेच बुद्धिमान असेल तर तो उमेदवार डोईजड होण्याची भीती,यातून डॅशिंगपणाच्या नावाखाली दर्जाहीन उमेदवार निवडण्याची प्रथा पडल्याने सामान्य माणसाने जसे राजकीय क्षेत्र वर्ज्य केले तसे तो आता मतदानही वर्ज्य करू पाहत आहे,यावर कुणीतरी प्रकाश टाकायला हवा, ही एक गरज आहे.
दुसरीकडे मनसे मेळाव्यात संदीप देशपांडे,बाळा नांदगावकर आणि इतरांनी आपली मते व्यक्त केली असली तरी राज यांच्याजवळ जाणारी भाषणे सभेत होतील असे सात-आठ वक्ते मनसेला उभे करावेच लागतील.राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांनाही सभेत व्यक्त होण्याची जास्तीत जास्त संधी मिळणे आवश्यक आहे.त्यातून युवावर्ग मनसेकडे कितपत वळतोय हे कळेल. पक्ष कोणताही असो,त्याला आपल्याला सत्ता मिळावी अशी इच्छा असणे स्वाभाविक आहे पण त्या मार्गाने वाटचाल करताना  उत्तम वक्तृत्व शैलीबरोबरच उपलब्ध संधी,गरजेनुसार तडजोड आणि आकड्यांचे गणित यातही पारंगत असणे आवश्यक असते.सामान्यजन याला लबाडी म्हणतात तर राजकीय भाषेत त्याला चतुराई म्हणतात. राज यांच्यासारख्या परखड नेत्याला हे जमेल का? हे महत्त्वाचे आहे.असो, विरोधकांची टीका किंवा मतभेदाचा मुद्दा निराळा आहे पण सतरा वर्षाच्या संघर्षात राज यांनी स्वतः वेगळा मार्ग चोखाळून तो ब-यापैकी यशस्वी करून दाखवला,हे सत्य स्वीकारण्याबरोबरच राज व त्यांच्या पक्षाला भावी वाटचालीसाठी  'मनसे' शुभेच्छा!

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute