तुम्ही आम्ही का संतापतो?

तुम्ही आम्ही का संतापतो? याचे विवेचन करताना उत्तर मिळून गेले की,आजकालच्या समाजात दंगेधोपे,हाणामारी करणे याला डॅशिंग म्हणण्याची वाढती राजकीय रीत व विचारी,विवेकी आणि अभ्यासू असणे म्हणजे बुळचटपणा असा समज रूढ होत चालला असून लहान पोरे वडीलधारी माणसावर खेकसू लागली की त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झाले,असे समजणारे पालक कमी नाहीत.
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती म्हणत सुजाण आततायी वर्तनाकडे दुर्लक्ष करणे पसंत करतात.पण असे दुर्लक्ष करण्याचा दुसरा अर्थ, समोरचा आपल्याला घाबरतो असा घेऊन आततायीपणा वाढतो आणि मग जशास तसे प्रत्युत्तर देण्याची वेळ येते,त्यातून काहीतरी अघटित घडून मग कायदेशीर यंत्रणा कामाला लागतात. अलिकडे हे प्रकार वाढतच चालले असल्याने या  सा-याचे मूळ असलेल्या मुद्द्याकडे लक्ष देणे गरजेचे असून,तुम्ही आम्ही का संतापतो? एरव्ही शांत वाटणारे चेहरे जमदग्नीचा अवतार का धारण करतात?हा विचार करण्यासारखा मुद्दा असून त्याकडे आरोग्य, सभोवतालची परिस्थिती आणि जन्मजात असलेले अवगुण अशा तिहेरी दृष्टिकोनातून पाहिल्यास सविस्तर विवेचन करता येते.
मूल जन्माला येते तेव्हापासून ते पूर्णपणे दुष्ट किंवा सुष्टही नसते. त्याला वाढवण्याची पद्धत आणि त्याचे आरोग्य तसेच सभोवताली असलेली परिस्थिती यावरून त्याच्या वर्तनातून प्रतिक्रिया व्यक्त होत असतात.वेळेत खाणे न मिळणे किंवा मनासारखे काहीएक न घडणे अशा सवयीत वाढणारी मुले नकारात्मकतेकडे खेचली जातात आणि सहनशीलता आधीच कमकुवत असल्याने किंवा प्रयत्न करून काही साध्य होत नाही असा पूर्वीचा अनुभव असल्याने ऐन उमेदीत टोकाचे पाऊल उचलतात.
उलटपक्षी लाडाकोडात वाढलेली मुले हट्टी बनतात आणि 'करेन ती पूर्व ' असा दृष्टीकोन ठेवून प्रतिक्रिया व्यक्त करत असतात.संधी मिळताच आपले इप्सित साधण्यासाठी दुस-यावर जबरदस्ती करणे आणि वेळप्रसंगी तरीही काही साध्य होत नसेल तर मग समोरचा नडतोय,असा समज करून संतापाने त्याचा काटा काढणे यासारख्या घटना घडत असतात.
याव्यतिरिक्त ज्यांना शांत राहणे आवडते किंवा ज्यांना वाचन,खेळ वा अन्य छंद आहेत अशी व्यक्ती आपले जीवन जोमाने पुढे रेटतात.पण तेथेही सभोवतालची परिस्थिती हा घटक महत्वाचा ठरत असल्याने विचारी माणसेही टोकाचे पाऊल उचलताना दिसतात. माणसावर अशी वेळ का यावी?याचे उत्तर शोधताना प्रथम आपण आयुष्यातील शांती हरवून प्रत्येक टप्प्यावर तुलना आणि स्पर्धेचा अतिरेक केलेला असल्याने काहीही करून पुढे जायचे इतकाच त्रोटक  विचार फोफावला, त्या तुलनेत  अपयश आल्यास काय? याची चर्चा कुणी सखोलपणे केली नाही आणि अपयशातून सुरूवात होऊन महान बनलेल्या व्यक्तींची चर्चा झाली नाही.परिणामी कुणी अपयशातून पुढे गेलेला आदर्शच  समोर मांडला न गेल्याने  संताप,चिडचीड आणि आत्महत्या इतकेच पर्याय स्वीकारण्यावर भर दिला जावू लागला.
समाजात शांतता व नवी जिद्द निर्माण करण्याची जबाबदारी असलेली मिडिया आणि मनोरंजनाची साधने कथा किंवा लेखात टोकाचा संताप,टोकाचे प्रेम आणि टोकाचे कृत्य असे टोकाचेच विषय लावून धरू लागल्याने याचे अनुकरण करत समाज परस्परव्देष्टा आणि हिंसक बनला. त्याचा अनेकांनी आपापल्या क्षेत्रात  फायदाही उचलला.परिणामी जीवनाचा संघर्ष वाढला,हेवेदावे वाढले आणि प्रिय व्यक्तीचा शेवटही तुकडे करून झाला.नात्यांमधील पवित्रता संपली.वाढत्या तापमानाप्रमाणे संतापाचा पाराही दिवसेंदिवस वाढत चालला आणि तुम्ही आम्ही का संतापतो? याचे विवेचन करताना उत्तर मिळून गेले की,आजकालच्या समाजात दंगेधोपे,हाणामारी करणे याला डॅशिंग म्हणण्याची वाढती राजकीय रीत व विचारी,विवेकी आणि अभ्यासू असणे म्हणजे बुळचटपणा असा समज रूढ होत चालला असून लहान पोरे वडीलधारी माणसावर खेकसू लागली की त्यांना सर्व ज्ञान प्राप्त झाले,असे समजणारे पालक कमी नाहीत.जरा काही झाले की,हाण आणि मार हाच मार्ग जो-तो अवलंबू लागल्याने भविष्यात कसे होणार हा प्रश्न असून प्रत्येकाने जमले तर डोक्यावर बर्फ ठेवून कृती करावी हा एक त्यावर उत्तम मार्ग ठरू शकतो.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute