त्रिगुणात्मक पुरुषोत्तम!

जन्मतःच कुणी कुणाचा अवतार म्हणून प्रसिद्धी पावत नाही तर समोर आलेल्या बिकट प्रसंगावर मात करून घडवलेल्या शौर्यातून अवतारी पुरूष म्हणून मान्यता मिळत असते.अशा महापुरुषांना धर्मबंधनात अडकवून न ठेवता ते समस्त मानव जातीला आदर्श कसे ठरतील हे पाहणे या घडीला महत्वाचे आहे.

संयम,मर्यादा,जिद्द आदी त्रिगुणांशी आजन्म एकनिष्ठ राहून अतुलनीय पराक्रमाबरोबरच एक उत्कृष्ट राज्यकर्ता म्हणून लौकिक कमावून मानवी रूपातून देवत्वाला अवतारी पुरूष म्हणून पोचण्याचा प्रभू श्रीरामांचा प्रवास सोपा नसला तरी तो आजकाल असाध्य आहे,असे म्हणून दुर्लक्ष करण्याजोगाही नाही. आस्तिक आणि नास्तिक अशा दोन गटात श्रीरामांविषयी मतभिन्नता जरूर असू शकते कारण सरसकट पौराणिक व्यक्तीरेखेकडे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले की,त्यावर विश्लेषण न करण्याची पळवाट आपसूकच उपलब्ध होते पण त्याचवेळेस संत महंत यांच्या अभंगात असलेल्या वर्णनाचे काय, यावर कुणी फारसा विचार करत नाही.श्रीराम हे मर्यादा पुरूषोत्तम ही झाली त्यांची पहिली ओळख पण क्षमाशील,सहिष्णु आणि समानतेचा पाया ठेवून आत्मपरीक्षण करणारा निधर्मी राजा,ही त्यांची पूर्ण ओळख.त्यामुळेच आयुष्यातील कोणत्याही संघर्षमय परिस्थितीकडे त्यांनी आपल्या मनाविरुद्धची घटना म्हणून कधी पाहिले नाही.पुराणातील कथा म्हणून श्रीराम चरित्राकडे न पाहता अनेक वेगळ्या कंगो-याने पाहण्याची गरज आहे. बालपणापासून ते सिंहासनाधीश श्रीराम या अनेक टप्प्यांवर सामान्य माणूस म्हणून कसे जगावे,आल्या अडचणींना तोंड कसे द्यावे,आपल्या गरजा मर्यादित कशा ठेवाव्यात,नवे दोस्त कसे जमवावेत, कुटुंब कसे संघटीत करावे, शत्रूशी वैर कुठपर्यंत ठेवावे,भक्ताच्या भक्तीचा आदर कसा करावा,राजा असूनही आजन्म विनयशील का असावे,आत्मपरीक्षण करणे का गरजेचे, असे विविध मुद्दे रामकथेतून विस्ताराने शिकायला मिळतात. रामायणातील विविध प्रसंग जीवन जगण्याचा मंत्र देतात पण त्याकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे.जन्मतःच कुणी कुणाचा अवतार म्हणून प्रसिद्धी पावत नाही तर समोर आलेल्या बिकट प्रसंगावर मात करून घडवलेल्या शौर्यातून अवतारी पुरूष म्हणून मान्यता मिळत असते.अशा महापुरुषांना धर्मबंधनात अडकवून न ठेवता ते समस्त मानव जातीला आदर्श कसे ठरतील हे पाहणे या घडीला महत्वाचे आहे.प्रत्येक धर्मात असे अनेक महापुरुष आहेत पण त्यांची चरित्रे जयंती,नवमी वा पुण्यतिथीच्या चौकटीत संबंधित धर्मसमुदाय अडकवून ठेवत असल्याने त्या चौकटी भेदून ही आदर्शवत व्यक्तीचरित्रे सा-यांच्या भेटीला सोहळ्याच्या माध्यमातून जाऊ शकत नाहीत,ही एक उणीव असून रंगारंग कार्यक्रमाचा मोह  टाळून  आपण सहिष्णूतेने साऱ्यांना सोबत घेऊन प्रभू श्रीरामांना एकत्रित वंदन करूया..श्रीराम आपल्याला नक्कीच या कामी आशीर्वाद देतील.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute