आटपा हो झडकरी!


हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात गडकरी वाकबगार आहेत.त्यांनी राज्य सरकारला  वृक्षारोपणाबाबत काही  सूचना केल्यात,त्यावर त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा तसेच बांबूची संरक्षक भिंत अपघात टाळण्यासाठी उभारण्यात यावी, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचविण्यात आले असून त्याची अंमलबजावणी कधी होते हे महत्त्वाचे आहे. गडकरी हायवेचे काम 'झडकरी ' पूर्ण करतील अशी अपेक्षा वाटते ती फोल ठरू नये.

मुंबई- गोवा महामार्गाचे काम या वर्षअखेरीस पुर्ण होऊन पुढील वर्षी जानेवारीत तो वाहतूकीसाठी पुर्णपणे खुला होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीच दिल्याने त्यावर भरवसा ठेवण्यास अडचण नाही असे म्हणण्यास हरकत नाही कारण समस्येच्या तळाशी जाऊन काम करण्याची पद्धत व कामाचा उरक वेळेत व्हावा यासाठी धडाडीने निर्णय घेण्याची क्षमता असलेले मंत्री म्हणून गडकरींची देशभर ख्याती असून याबरोबरच अपयश स्वीकारण्याची तयारीदेखील ठेवलेली असल्याने विरोधक त्यांच्यावर फार टीका करण्याचे टाळतात.रामनवमीच्या दिवशी मुंबई- गोवा महामार्गाची हवाई  पाहणी करण्याबरोबरच सुमारे 15 हजार कोटींच्या तीन नव्या प्रकल्पांची घोषणा त्यांनी केली असून पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांचा विचार करता सर्व कामे वेगाने सुरू करण्याबरोबरच शक्य तेवढ्या कमी वेळात उरक करण्यावर भर असणार हे वेगळे सांगण्याची गरज नसावी.मुंबई-गोवा महामार्गाचे मागील 13 वर्षे भिजत घोंगडे पडलेले असून त्याची अनेक कारणे आहेत. जानेवारी 2010 ते एप्रिल  2021 या कालावधीत 2442 जणांनी विविध अपघातात या महामार्गावर जीव गमावले तर त्याहून कितीतरी अधिक संख्येने जायबंदी झालेले आहेत.या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 11,500 कोटी रुपयांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते.मात्र प्रत्यक्षात कामाला वेग नाही आणि ढिसाळ नियोजन यामुळे कोकणवासियांची परवड काही संपली नाही.त्यामुळे आंदोलन व उपोषणे सुरू झाली.यातूनच मग मुंबई- गोवा हायवे ध्येयपुर्ती समिती गठित झाली.बिगर राजकीय असलेली ही समिती आहे. त्याशिवाय हा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयात 2018 पासून गेला असून जनहित याचिकेवरील  सुनावणीदरम्यान डिसेंबर  2023 पर्यंत काम पूर्ण होईल असा शब्द आपल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने दिला होता. आता गडकरी यांनीच   लक्ष घातल्यामुळे कामाला गती येईल पण त्याचवेळेस बांधकाम झालेल्या रस्त्याला खड्डे पडणार नाहीत आणि सण उत्सव काळात वाहतूक वाढल्यावर प्रवास रेंगाळणार नाही याची दक्षता घेतली जाणे महत्त्वाचे आहे.

नितीन गडकरी यांनी सांगितलेला सविस्तर तपशील खूप महत्त्वाचा आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पाची 10 पॅकेजमध्ये विभागणी करण्यात आली.त्यापैकी पी-9 व पी-10 हे सिंधुदुर्गात येत असून ते 99 टक्के पूर्ण आहे.रत्नागिरीत पाच पॅकेजेस असून दोन पॅकेजीस पी-4 व पी-8 हे अनुक्रमे 92 टक्के व 98 टक्के काम पूर्ण झाले आहेत.पी-6 व पी-7 पॅकेजीससाठी नवा कंत्राटदार नियुक्त करण्यात आला  असून कामाला सुरुवात झालेली आहे.त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यात तीन पॅकेजेस येत असून पी-2 व पी-3 चे काम अनुक्रमे 93 टक्के  व 82 टक्के पूर्ण झाले आहे. पी-1चे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झालेले आहे.
रायगड जिल्ह्यातील काम रखडण्यामागील कारणे देण्यात आली असून पनवेल ते इंदापूर दरम्यान भूमी अधिग्रहणाला लागलेला विलंब आणि पर्यावरणविषयक परवानग्या यामुळे काम रखडले होते.कर्नाळा अभयारण्यानजीकचा उड्डाण पूल पर्यावरणाचा विचार करून काढण्यात येणार आहे. गोव्यातील काम पूर्ण झाले आहे. गडकरींनी 15 हजार कोटीच्या तीन प्रकल्पाची घोषणाही केली.त्याचा आराखडा जाहीर करून कामाला लवकरच सुरूवात होणार आहे.हाती घेतलेले काम पूर्ण करण्यात गडकरी वाकबगार आहेत.त्यांनी राज्य सरकारला  वृक्षारोपणाबाबत काही  सूचना केल्यात,त्यावर त्यांनी योग्य तो निर्णय घ्यावा तसेच बांबूची संरक्षक भिंत अपघात टाळण्यासाठी उभारण्यात यावी, असे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला सुचविण्यात आले असून त्याची अंमलबजावणी कधी होते हे महत्त्वाचे आहे. समृद्धी महामार्ग वेळेत पूर्ण होऊ शकतो पण मुंबई- गोवा महामार्गाचे काम रखडते हे राज्य आणि केंद्र सरकारलाही शोभा देणारे नाही.दुसरे म्हणजे महामार्गाचे काम पूर्ण झाले म्हणजे सर्व पार पडले असे नसून टोलनाके आणि टोल आकारणी हे धोरणही वेळेत निश्चित व्हायला हवे नाहीतर त्यावरून आंदोलन सुरू व्हायचे.सत्ताधारी व विरोधकांसाठी असे मुद्दे किती महत्वाचे हा भाग निराळा पण कामे वेळेत पार पडली की खर्च वाढत नाही आणि समस्याही डोईजड होत नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute