होळीची वेताळकथा!

होळी जर देवाच्या नावाने साजरी केली जात असेल, त्यासाठी झाडे तोडली जात असतील  आणि देवाने हे विश्व निर्माण केले असेल तर मग त्या विश्वाचा पर्यावरणपूरक महत्त्वाचा  घटक असलेले वृक्ष तोडलेले देव कसा खपवून घेतो? ... या प्रश्नाचे उत्तर तू माहीत असूनही दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर छकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील...वेताळाच्या या प्रश्नावर विक्रमादित्याने शांतपणे उत्तर देण्यास सुरूवात केली

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. नेहमीप्रमाणे झाडावरील प्रेत खांद्यावर घेऊन तो शांतपणे मंद पावले टाकत स्मशानातून निघाला. तेव्हा त्या प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला, राजा मला एक कळत नाही की जे साध्य होणार नाही ते पुन्हा पुन्हा करण्याचा अट्टहास तू का करत आहेस? माणसाच्या अंगी अहंकार,लोभ,बेजबाबदारपणा  आणि स्वार्थी वृत्ती बळावली की  त्याची वाटचाल ऱ्हासाकडे चाललेय हे समजून जावे. आपण स्वतः जगताना भूतलावरील इतर जीवानाही जगण्याचा हक्क आहे हे समजून घेणे आवश्यक आहे.अशीच एका संपन्न भूमीची वाळवंटाकडे सुरु असलेल्या वाटचालीची गोष्ट आज तुला सांगतो.  परशुराम भूमी तशी निसर्गसंपन्न आणि विद्वानांची खाण पण रूढी आणि परंपरा काळानुसार बदलून आपल्याला सण समारंभ साजरे करावे लागतील, हा विचार काही तिथे कुणालाच  मानवाला नाही आणि होळीसारख्या सणाचे निमित्त साधून अनेक वर्षे झाडांची कत्तल होऊ लागली. सुरुवातीला यात काही वावगे वाटत नव्हते कारण एकाएकी कोणत्याही घटनेचे परिणाम समोर येत नसतात. पण आता ते येऊ लागलेत. राजा तुला सांगतो, नुसते पुढारी किंवा नेता जन्माला येऊन त्या भागाचा विकास होत नसतो तर वेळप्रसंगी जनताजनार्दन चुकत असेल  तर त्यालासुद्धा भविष्यातील  परिणामांची कल्पना देऊन कठोर निर्णय घ्यावे लागतात,पण तसे केले तर खुर्ची जाईल ही भीती असते आणि त्यातून मग सुधारणा होत नाहीत.
 आता  या परशुराम भूमीवर भगवान परशुरामाचे खूप प्रेम, आणि त्यामुळे येथे काही आफत आली तर मी क्षणात धावून  येईन,तुम्ही फक्त घंटानाद करा.असे परशुरामाने आपल्या एका लाडक्या भक्ताला सांगितले आणि तो भक्त हे गुपित ठेवायचे सोडून  आपण कसे भाग्यवान,हे इतर  आपल्या सहका-यांना सांगू लागला.त्याची परीक्षा बघण्यासाठी या सा-यांनी घंटा वाजवून पाहिली आणि परशुराम त्या त्या वेळी आलेही पण पाहतात तर सर्व ठीक होते, पण मग हे लोक सतत घंटा वाजवून आपली चेष्टा करतात असे समजून परशुराम आपल्या भूमीकडे पाठ फिरवून निघून गेले.इकडे संतप्त झालेल्या निसर्गाने हळूहळू  आपले उग्र रूप दाखवण्यास सुरूवात केली.फयान, तौक्ते आणि निसर्ग अशी पाठोपाठ चक्रीवादळे या भूमीवर  सोडण्यास सुरूवात केली.त्सुनामीच्या झळा बसू लागल्या,मासे नष्ट होऊ लागले आणि वातावरण रोगट झाले, आता तर माणसे बोलतात कमी आणि खोकतात जास्त,असे चित्र सगळीकडे दिसते.
आधीच विकासाच्या नावाखाली जगभर  निसर्गाची तोडफोड सुरू असताना परशुराम भूमी त्यापासून धडा घेऊन सुधारेल व असे काही करणार नाही हा निसर्गाचा कयास साफ चुकला आणि त्यातून झालेली निराशा निसर्गाच्या कोपात परावर्तित होऊन आपत्ती वाढत चालल्या.  ज्या भूमीने 1960 मध्ये चक्रीवादळ पाहिले, त्या भूमीच्या नशिबी कवच गमावलेल्या कर्णाचे भोग आले.एकेकाळी मामाच्या गावाला जावू या...म्हणणारी लहान मुले आता गावी पाणीटंचाई आणि कडक उन्हाळा शहरासारखा असल्याने यायला कंटाळून गेली.त्यातच आंबा, काजू, करवंदे, चाराबोरे  पूर्वीसारखी उरली नाहीत. गोठ्यात असलेली गुरे गायब झाली आणि मामाच्या गावचे गुरांचे गोठे ओस पडले. त्यामुळे सुट्टीत यायला पूर्वीसारखा उत्साह राहिला नाही. अशा या भूमीत हातालाही धड  काम नाही आणि असले तरी पोटभर मोबदला नाही अशी विचित्र अवस्था आहे. हे सर्व कशामुळे झाले तर भविष्याचा नसलेला विचार आणि जुन्या धोरणांना चिकटून राहण्याची खोड. यामुळे एका सुरेख भूमीची अवस्था दृष्ट लागल्यासारखी झाली आहे.  हे  सर्व सांगत असताना वेताळ मध्येच थांबला आणि म्हणाला,होळी जर देवाच्या नावाने साजरी केली जात असेल, त्यासाठी झाडे तोडली जात असतील  आणि देवाने हे विश्व निर्माण केले असेल तर मग त्या विश्वाचा पर्यावरणपूरक महत्त्वाचा  घटक असलेले वृक्ष तोडलेले देव कसा खपवून घेतो? ... या प्रश्नाचे उत्तर तू माहीत असूनही दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर छकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील. विक्रमादित्याने शांतपणे उत्तर देण्यास सुरूवात केली.तो म्हणाला की,देवांनी विश्वाची निर्मिती केली,हेच मुळात चुकीचे वाटते.जेव्हा एखादी निर्मिती तुम्ही करता तेव्हा तुम्ही तेथे जागृत रक्षक ठेवून आपलाही अधिवास तेथेच सजीव रूपात ठेवावा लागतो.असे काहीच देवांनी केलेले दिसत नसल्याने व फक्त अवताराचे सूर आळवल्याने किंवा मंदिरात राहण्यापुरतेच त्यांचे अस्तित्त्व उरल्याने आता ब्रम्हांडाची निर्मिती कुणी केली आणि कधी झाली याचा शोध शास्त्रज्ञ घेताना दिसतात.त्यामुळे जर विश्व देवांनी निर्माण केले असते तर आपल्या नावाखाली कुणी इतर वनस्पती वा प्राण्यांचा छळ करत असेल तर जसे राक्षसांना अद्दल घडवण्यासाठी देव अवतार घ्यायचे तसे काही निमित्त न देता आताही अवतरले असते पण तसे त्यांनी न केल्याने विश्व हे स्वयंनिर्मित होते आणि ते आपण निर्माण केल्याचे श्रेय कुणीतरी घेऊ पाहत होते,असा कयास निघतो.दुसरे असे की, विश्व म्हणजेच निसर्ग,जो आपला समतोल साधण्यास सक्षम आहे आणि म्हणून तापमान वाढल्यावर कमी दाबाचा पट्टा,त्यामुळे कधी पाऊस तर कधी चक्रावात असे प्रकार घडत असतात.भूकंप व महापूर ही आणखी निसर्गाची दोन ठेवणीतली अस्त्रे. ती सुरू झाली की घाबरगुंडी उडालेला माणूस देवाचा धावा करतो पण देव मुकाच असतो कारण त्याला माहीत असते की,जेव्हा वृक्षाची होळी करताना आपण मूकनायक होतो तसेच आताही मूकनायक रहायचे आहे.एकदा प्रकरण कोर्टात गेले की,सरकार काही करू शकत नाही.अगदी तसेच निसर्ग व कालचक्र सुरू असताना त्यात देव हस्तक्षेप करू शकत नाही.पण हे थेट सांगायचे सोडून, ज्याच्या त्याच्या पूर्व संचिताचा भाग असा गुळगुळीत दावा देवांकडून  युगानुयुगे करण्यात आला  आहे. शेवटी तात्पर्य हेच की,जगणा-याला जगू द्यावे नाहीतर आपल्या जीवावरही  कुणीतरी दुसरा उठतोच आणि वाढत्या रोगराई व इतर जगण्यापुढील आव्हाने  हा त्याचाच एक भाग ठरतो.विक्रमादित्याच्या या उत्तरावर वेताळ खूष झाला आणि विक्रमादित्य  पुढे काही बोलणार इतक्यात  राजाचे मौनभंग होताच वेताळ प्रेतासह उडाला आणि पुन्हा झाडावर जावून लोंबकळू लागला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute