स्वार्थी जातीचे लोक!

स्वार्थी जातीचे लोक!
प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेणे हा अपराध नाही तर त्या परिस्थितीवर मात करून जेव्हा आपण यशाच्या सर्वोच्च टप्प्यावर असतो,तेव्हा पुर्वी आपण ज्या परिस्थितीतून आलो ते दिवस आणि अशा संकटात कुणी असेल तर त्याला होईल तेवढी मदत करण्यास अजिबात विसरता कामा नये. एकदा पैशाची भूक वाढली की गरजा वाढतात आणि त्या पुर्ण करण्याच्या नादात माणसे स्वार्थी व आत्मकेंद्रित बनतात.ज्या मुलाला दोन रुपयाची गरज होती,त्याला ते दिले गेले असते तर त्याचा चांगुलपणावर विश्वास बसला असता पण त्याऐवजी त्याला हडतुड करण्यात आल्याने तो चोरीच्या मार्गाला वळला.
                    .....................

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. झाडावरील प्रेत  खांद्यावर टाकून तो शांतपणे स्मशानातून चालू लागला.इतक्यात त्या प्रेतात बसलेला वेताळ त्याला म्हणाला की,राजा तुझ्या स्वार्थासाठी तू हे असे उद्योग करत आहेस पण त्यामुळे तू अप्पलपोटा ठरण्याची शक्यता अधिक दिसते आणि एकदा ही सवय जडली की,तुझ्यातील माणुसकी पुर्णपणे मरून जाईल.अशाच एका माणसाची कथा तुला आज ऐकवतो.
भाग्येश नावाप्रमाणेच भाग्यवान  होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा संयमाने व कष्टाने मुकाबला करत त्याने यश मिळवले.बालपणी आईवडील गेल्यानंतर नातेवाईकांचा आधार नसल्याने त्याला आश्रमाची वाट धरावी लागली.पोराने समोर आलेल्या प्रसंगाला तोंड दिले आणि गाडी पुसण्यापासून ते हॉटेल व बेकरीमध्ये मिळेल ते काम करून तो शिकत राहिला. शिक्षण संपताच थोड्या संघर्षानंतर त्याला सुरेख जाॅब मिळाला आणि दिवस पालटले.सुरूवातीला चौघांच्या खोलीत राहणारा मुलगा स्वतंत्र ब्लॉकमध्ये राहू लागला. कालांतराने त्याने मोठे घर घेतले आणि संसारात बसला.पैशाची ददात नव्हती व त्यामुळे गरजा काही संपण्याचे नाव घेत नव्हत्या. अशातच एके दिवशी तो बाहेर जात असताना त्याच्यासमोर एक मुलगा आला,त्याला फक्त दोन रूपये हवे होते,भाग्येशने त्याला हाकलून दिले व तो तडक पुढे निघाला.
काही दिवसांनी त्याच्याच ऑफीसचा एक माणूस पत्नीच्या आजारासाठी व्याजी पैसे त्याच्याकडून घेऊन गेला आणि व्याज व मुद्दल परत करणे त्या माणसाला न जमल्याने त्याचे दागिने भाग्येशने ताब्यात घेतले.या व्याजीतून मस्त कमाई होते गड्या,असे म्हणत त्याने हा जोडधंदा सुरू केला.पत्नीच्या अंगावर महागडे दागिने दिसू लागले आणि स्वतः भाग्येश  कनकेश बनला. हे करताना त्याचा अहंकार इतका वाढला की,तो ओळखीच्या माणसांना ओळख दाखवायचा बंद झाला.त्यामुळे कुणाचे अडले नाही पण एके दिवशी त्याच्या घरावर दरोडा पडला आणि काठीने नवरा बायकोला मारहाण करत चोरट्यांनी ऐवज लंपास केला.टाहो फोडूनही कुणी पुढे आले नाही फक्त वाईट झाले रे...असे म्हणत  सर्वजण चुकचुकत राहिले. हे सांगत असताना वेताळ मध्येच थांबला आणि म्हणाला,संकटात मतभेद बाजूला ठेवून प्रतिस्पर्ध्याचा मुकाबला करायचे राहिले बाजूला तर सर्वजण फक्त चुकचुकत राहिले,हे असे का? या प्रश्नाचे उत्तर माहित असूनही तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर छकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील.
  वेताळाच्या  प्रश्नावर शांतपणे विचार करून  विक्रमादित्य म्हणाला की, प्रतिकूल परिस्थितीत जन्म घेणे हा अपराध नाही तर त्या परिस्थितीवर मात करून जेव्हा आपण यशाच्या सर्वोच्च टप्प्यावर असतो,तेव्हा पुर्वी आपण ज्या परिस्थितीतून आलो ते दिवस आणि अशा संकटात कुणी असेल तर त्याला होईल तेवढी मदत करण्यास अजिबात विसरता कामा नये. एकदा पैशाची भूक वाढली की गरजा वाढतात आणि त्या पुर्ण करण्याच्या नादात माणसे स्वार्थी व आत्मकेंद्रित बनतात.ज्या मुलाला दोन रुपयाची गरज होती,त्याला ते दिले गेले असते तर त्याचा चांगुलपणावर विश्वास बसला असता पण त्याऐवजी त्याला हडतुड करण्यात आल्याने तो चोरीच्या मार्गाला वळला आणि बहुधा या दरोडय़ाचा तोच सूत्रधार  ठरला. लोकांनाही असाच अनुभव आल्याने ते मध्ये पडले नाहीत.
विक्रमादित्याच्या उत्तरावर वेताळ खूश झाला व अशा प्रकारे राजाचे मौनभंग होताच तो प्रेतासह उडाला आणि पुन्हा झाडाला जाऊन लटकू लागला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute