मोठ्याचे काम मोठे!

अक्कलशून्य जसा आपल्याला अविचारी वाटतो तसा त्याच्याकडे असलेला सर्वाना   समान वागणूक देण्याचा गुण आपल्याला दिसत नाही. प्राणी अक्कलशून्य वाटले तरी ते म्हणूनच यशस्वी मायबाप ठरतात जे एकमेकांना त्रास देत नाहीत. मोठ्याने  वनवास स्वीकारला कारण तो आपल्या आईवडिलांना ओळखत होता.पण ज्याला आपले पहिले अपत्य म्हणून जन्म दिला ते अपत्य समाजाला कळले मात्र त्याच्या आईवडिलांना ओळखता आले नाही,हे नवल!

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही.नेहमीप्रमाणे झाडावरील प्रेत खांद्यावर टाकून तो स्मशानातून मंद पावले टाकत निघाला. इतक्यात त्या प्रेतातील वेताळ त्याला म्हणाला की,राजा निष्काम सेवा करणारा, त्यातून प्राप्त फळाचा विचार कधीच करत नाही.पण तुझ्यासारखे वेळ व्यर्थ दवडून तेच तेच करत बसतात,तेव्हा ह्यांचा जन्म कशासाठी? असा नेमका प्रश्न पडतो.आज तुला एका वनवासीची कथा ऐकवतो.दोन भाऊ लाडाकोडात वाढले.आईवडिलांचा त्यांच्यावर खूप जीव, मोठा खूप प्रेमळ आणि धाकटा मात्र मितभाषी व जेवढ्यास तेवढे बोलणारा.चारचौघात मिसळणाऱ्या मोठ्या मुलाची जो-तो चौकशी करायचा पण धाकटयाला  मात्र हे प्रेम मिळत नव्हते. परोपकारी वृत्ती असलेल्या मोठ्याचा साऱ्यांना हेवा वाटे.दीनदलितांसाठी पदरमोड करताना आपले बस्तान कसे बसणार? याचा विचारही त्याने कधी केला नाही.लहानाने मात्र कमाई साठवत व कुणाला त्याच्यादृष्टीने व्यर्थ वाटेल अशी  मदत करायचे टाळले.नंतर एक मुलगी पटवून तिच्याशी लग्नही करून तो मोकळा झाला. त्यानंतर वर्षातच नातवाचे घरी आगमनही झाले आणि सारे त्यात रंगून गेले.मोठा आपले काम  करत होता.एका रात्री  तो झोपलाय असे समजून घरात खलबते सुरू झाली.आईवडिलांना मतवून लहान भाऊ, मोठा कसा बेजबाबदार आहे,हे सांगू लागला.आईवडीलांनी त्याच्या 'हो' ला 'हो' देऊन आपण सावध असल्याचे सांगितले. हा संवाद ऐकणा-या मोठ्या भावाला आजवर कितीतरी जणांनी त्याच्या आईवडीलांविषयी सांगितले होते पण तो विश्वास ठेवत नव्हता.आज त्याची खात्री पटली होती. रात्री तो तसाच उठला आणि कुणालाही तोंड न दाखवता निघून गेला.नगर सोडून गेल्यावर मोठ्याने आपला काहीच ठावठिकाणा ठेवला नाही.अंगावर वल्कले धारण करून तो वनात निघून गेला. पुढे त्याचा जगाशी संपर्क तुटला आणि एका गुहेत राहून जंगलात मिळणारी कंदमुळे व फळे खावून त्याचा पुढचा प्रवास सुरू झाला.इकडे  लहान भाऊ व आईवडिलांनी  तो गेला असे समजून शोक व्यक्त केला.सुरूवातीला त्याचा शोधही घेतला पण नंतर, ही देवाची इच्छा असे सांगत विषय मागे पडला.सुंठीवाचून खोकला गेला असे म्हणून सारे सुरळीत सुरू झाले.अशातच विविध सणांपैकी एक असलेला गणेशोत्सव संपला आणि त्याच रात्री प्रलंयकारी भूकंप आला.यात सारे नगर गाडले गेले.इतके दिवस गायब झालेला तो वनवासी त्यात वाचला आणि स्वतः तहानभूक विसरून बचावाला लागला.अनेक जीव वाचले कारण बचावकार्य वेळेत सुरू झाले होते. त्यानंतर कुणाशी काही न बोलता तो निघाला  तेव्हा अनेकांनी त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला असता दोन्ही हात दाखवून 'नांदा सौख्यभरे' असे पुटपुटत आणि वा-यावर भुरभुरणा-या आपल्या दाढीवरून हात फिरवून तो वनवासी आपल्या मार्गाला लागला.वेताळ मध्येच थांबला आणि म्हणाला की,स्वतः जन्माला घातलेल्या जीवांना अशी सापत्नभावाची वागणूक आईवडील का देत असावेत?यात वनवासी जीवाचा अपराध तो काय? या प्रश्नांची उत्तरे तू माहीत असूनही दिली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर छकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील.वेताळाच्या या प्रश्नांवर विक्रम शांतपणे म्हणाला की, मुले जन्माला घालणा-यांना आईवडील ही पदवी आपसूकच लागते पण ते आईवडील असतातच असे नाही.प्राणीही पिल्लांना जन्म देतात तेव्हा ते आईवडील झाल्याचा टेंभा मिरवत नाहीत कारण त्यांना अक्कल नसते.अक्कलशून्य जसा आपल्याला अविचारी वाटतो तसा त्याच्याकडे असलेला सर्वाना   समान वागणूक देण्याचा गुण आपल्याला दिसत नाही. प्राणी अक्कलशून्य वाटले तरी ते म्हणूनच यशस्वी मायबाप ठरतात जे एकमेकांना त्रास देत नाहीत. मोठ्याने  वनवास स्वीकारला कारण तो आपल्या आईवडिलांना ओळखत होता.पण ज्याला आपले पहिले अपत्य म्हणून जन्म दिला ते अपत्य समाजाला कळले मात्र  आईवडिलांना ओळखता आले नाही. तो जे बोलायचा ते निःस्वार्थीपणे करायचा आणि त्यासाठी जीव पणाला लावायचा त्यामुळेच तो अनेक लोकांना देवही वाटू लागला.आयुष्यात  ही इतकी  मोठी मिळकत घेऊन वनवासी जगणे कुणालाच शक्य नाही तर संसार करताना आपल्यापुरता विचार करणारे असेच नैसर्गिक संकटात गाडले जायचे आणि पुन्हा त्यांना वाचवायला हा जीव जेव्हा  वनातून परत येतो तेव्हा तो देवदूतच ठरतो.त्याला प्रणाम करताना गाडलेल्या मातीतून बाहेर पडलेले थरथरणारे हात पाहून देवही धास्तावला असेल कारण मोठ्याचे कार्य देवापेक्षाही खूप मोठे होते. अशी माणसे समाजाला हवी आहेत अगदी तसेच समाजानेही त्यांना जगवले पाहिजे.विक्रमादित्याच्या या उत्तरावर वेताळ खूश झाला आणि अशा प्रकारे राजाचे मौनभंग होताच वेताळा प्रेतासह उडाला आणि पुन्हा झाडावर जाऊन लटकू लागला.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute