पाण्यासाठी दाहीदिशा!

बोरकर बाव ही जलदायिनी दुसरी गंगाच.अनेकांचे सुकलेले कंठ तिने ओले केले.दमदार झरे असल्याने पंप लावून विहीर कोरडी झाली तरी ती अर्ध्या तासात पुन्हा भरत असे.१४ एप्रिलला बाबासाहेबांच्या ग्रामपंचायतीत असलेल्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव यायचे. कार्यक्रम आटोपला की ते सर्वजण बोरकर बावीवर पाणी पिण्यासाठी  येत.तेथे पाणी पिऊन ते घरची वाट धरत असत. अशा प्रकारे समानतेचे प्रतिक असलेली बोरकर बाव तहानलेल्यासाठी ख-या अर्थाने गंगामाई होऊन उभी रहायची आणि अजून रहात आहे.

'अन्नासाठी दाहीदिशा....आम्हा फिरविशी जगदीशा' हे जरी कुणी फार वर्षापूर्वी लिहून ठेवले असले तरी त्यात थोडा बदल करून 'पाण्यासाठी दाहीदिशा 'वैगेरे बदल केले म्हणून काही बिघडेल असे वाटत नाही. राज्यात पाणीटंचाईला आयुष्यात एकदाही सामोरा गेलोच नाही असा अनुभव असलेला कदाचित जन्माला येताना तोंडात सोन्याचांदीच्या चमच्यातून   सप्तनद्यांचे गोड पाणीच घेऊन आलेला असायला हवा.कारण पाऊस कितीही पडला तरी मार्चपासून पाणी गायब हे चित्र राज्याच्या अनेक भागात  काही आताचे आहे असे नव्हे.गावागावातले पाणवठे कोरडे पडले की,पाण्यासाठी वणवण सुरू होते. मग अशावेळेस कुणाच्या नशिबी कसले भोग येतील हे जन्म कुंडलीत छळवादी म्हणून टपून बसलेल्या राहू-केतू यांनाही कळणार नाही.
माझ्या बालपणात एप्रिलमध्ये परीक्षा झाल्यावर शाळेला गेलो न् गेलो ते काही फार महत्त्वाचे नसायचे पण पाण्याच्या शोधात बोरकर बावीवर (विहीर) हजेरी लावण्याला दुसरा पर्याय नव्हता.यथाशक्ती, आजकालच्या युगात टमरेल सदरात मोडेल इतक्या मापाच्या हिरव्या बादलीत  पाणी भरून धांदरटपणे मातीच्या तापलेल्या रस्त्यावरून अनवाणी चालण्याचा तो प्रसंग इतक्या वर्षानंतर अजूनही तसाच ताजा  असून कालपरवा घडल्यासारखा वाटतो.बादलीतले अर्धेअधिक पाणी रस्त्यावर शिंपले जायचे आणि शिकस्तीने एका धिप्पाड पुरूषाची तहान कशीबशी भागेल इतपत पाणी घरपर्यंत पोचत असे.आजच्यासारखे घरोघरी पंप आणि नळाचे ते युग नव्हतेच मुळी.  पर्यालगत असलेली आमची विहीर पाडव्यानंतर आटली की,घरातील सर्व मंडळी पाणी मोहिमेत सहभाग घेत असत. दोन मोठे हंडे,कळश्या, बादल्या वैगेरेंचा लवाजमा घेऊन बोरकर बाव सुरूवातीला सकाळी नऊ वाजल्यापासून आणि मग मे महिन्यात पहाटे साडेतीनलाच सेलवर चालणारी एक बॅटरी आणि कंदीलाच्या मंद प्रकाशात गाठावी लागत असे.एकदा का त्याकाळातल्या धनवंतांचा विहिरीला लावलेला पंप सुरू झाला की,विहीर कोरडी पडेपर्यंत किंवा लाईट जाईपर्यंत तो बंद होणे शक्यच नव्हते.अशावेळेस अख्खा गाव तहानेने मेला तरी त्यांना फरक पडायचा नाही.भारतावर इंग्रजांनी राज्य करताना काही प्रवृत्ती येथे पेरल्या होत्या,त्यातील ही एक प्रवृत्ती होती.
कडक उन्हाळ्यात घशाला कोरड पडली की,गुरेही पाणी शोधत येत असत. त्यांनाही पाणी पाजण्याइतपत माणुसकी आणि वेळ त्याकाळात माणसांकडे होता.बोरकर बाव ही जलदायिनी दुसरी ग॔गाच होती.अनेकांचे सुकलेले कंठ तिने ओले केले होते.दमदार झरे असल्याने पंप लावून विहीर कोरडी झाली तरी ती अर्ध्यातासात पुन्हा भरत असे.१४ एप्रिलला बाबासाहेबांच्या ग्रामपंचायतीत असलेल्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने बौद्ध बांधव यायचे. कार्यक्रम आटोपला की ते सर्वजण बोरकर बावीवर पाणी पिण्यासाठी  येत.तेथे पाणी पिऊन ते घरची वाट धरत असत. अशा प्रकारे समानतेचे प्रतिक असलेली बोरकर बाव तहानलेल्यासाठी ख-या अर्थाने गंगामाई होऊन उभी रहायची आणि अजून रहात आहे हे अभिमानाने सांगताना ऊर भरून येतो. 
आम्ही मोठे झालो आणि कामाचा भाग म्हणून गावापासून दूर गेलो.आजकाल नळ, बोअरवेल अशा माध्यमातून पाणी घरात येऊ लागल्याने पाण्यासाठीची पायपीट ज्यांच्या नशिबी आहे ते सोडून इतरांना या आठवणी दंतकथा किंवा अतिशयोक्तीही वाटू शकतात.पण आमच्या घरात असलेल्या पितळेच्या भांड्यांना ते वापरणा-या माणसाची नावे दिलेली आहे.त्यात तात्याच्या (आजोबा) वापराचा   शक्तीशाली हंडा,बाबांच्या पसंतीचा तरणाबांड पितळी  हंडा,आई आणि बाबी यांच्या वापराच्या कळश्या यांचा समावेश असून आमच्या नशिबी आलेल्या प्लॅस्टिक बादल्या जीर्ण होऊन काळाच्या उदरात गडप झाल्या आणि आठवणी मात्र आजही कायम राहिल्या आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute