घड्याळबाबा

 


काॅलेजमध्ये तास सुरू असताना मागील बेंचवरून या घडयाळातून टारगट विद्यार्थी आवाज काढत आणि वर्गभर हशा पिकल्यावर शिकवण्यात तल्लीन असलेल्या शिक्षकाचा पारा चढत असे पण हे घड्याळ खिशात दडवले जात असल्याने ते सापडत नसे. वेळेशिवाय घड्याळांचा असाही उपयोग करता येतो, हे विद्यार्थ्यांशिवाय दुसरे कुणालाच उमगणे शक्य नाही.आता मोबाईल आले आणि त्यात घड्याळ व तारीख दिसू लागले,त्यामुळे घड्याळबाबा जरा मागे पडल्यासारखे झालेत पण तरीही घराची भिंत आणि माणसाचा हात याला घड्याळाशिवाय शोभा नाही.शिवाय पुर्वीच्या बालभारतीच्या पुस्तकात उल्लेख  केल्याप्रमाणे त्यांचे काम आजही तेच आहे.

घड्याळबाबा हे तसे बालपणापासूनचे म्हटले तर जुने सोबती पण आमच्या घरात यायला त्यांना तसा उशिरच झाला. मात्र १९८० च्या काळात घड्याळ भिंतीवर किंवा हातात नसले म्हणून वेळ कळणार नाही अशी काही कुणाची फार पंचाईत झालेली नव्हती. माणसाने गरजा मर्यादित ठेवल्या म्हणजे असे काही कुणाचे कुणावाचून  अडत नाही.पहिलीत असताना हे घड्याळबाबा बालभारतीत अवतरले पण ते हाती यायला नववी उजाडली. या घड्याळाचे कोणत्याही पक्षाची निशाणी नसल्यापासून खूप मोठे आकर्षण वाटत असे. तसेही, 'घड्याळ वेळेकरिता आहे,शोभेकरिता नाही' असा एक सुविचार होता. पण त्या सुविचारांचा अर्थ समजून घेण्याचे ते वय नव्हते त्यामुळे आपल्या हातात एक सुरेख असे घड्याळ असावे असे राहून राहून वाटायचे पण वेळेकरता असलेले हे घड्याळ त्या काळात चैनीची वस्तू वाटेल इतपत महाग होते. त्यामुळे मोजक्या मनगटांवर  ते दिसायचे. 1980 चा जमाना चावी दाबून घड्याळ चालवण्याचा होता.एचएमटी कंपनीची मनगटी घड्याळे आणि त्याला स्टीलचा पट्टा असे.सिटीझन म्हणून एक कंपनीसुद्धा होती.घड्याळात तारीख,वार आणि ते वॉटरप्रूफ हवे असेल तर जास्त पैसे मोजावे लागत पण  ते एक प्रतिष्ठेचे साधन होते.टणटण टोल्यांचे घड्याळ तेव्हा खूपच लोकप्रिय होते.त्याला आठवड्यातुन एकदा चावी द्यावी लागत असे.लंबकावर ते चालायचे.पुढे याच लंबकावरून  भौतिकशास्त्रात हिवाळ्यात लंबकी घड्याळे वेगाने पुढे पळतात याचे कारण सांगण्यात आले होते. त्याकाळात आकड्यांचे सेलवर चालणारे घड्याळ होते पण त्याचा सेल आजच्यासारखा सहज मिळणे शक्य नसे.आमच्या मातीच्या भिंती असलेल्या जुन्या घरात लंबकी घड्याळबाबा सुरूवातीला अवतरले.हे घड्याळबाबा दिवसरात्र टिकटिक करून अतिशय सुमधूर आवाजात टोले द्यायचे. एकंदरीत तेव्हाच्या सर्वच प्रकारच्या टोल्यांचा सूर, मन आणि डोके दुखवणारा नसायचा.आताच्या जमान्यात घड्याळ टोले देण्यापेक्षा सकाळी दहा वाजता मानवी भोंगे न चुकता शिवराळ टोले वाजवतात.आता विविध प्रकारची घड्याळे बाजारात उपलब्ध आहेत.त्यात काही घड्याळात कोंबड्याचा आवाज,विशिष्ट धुनही वाजते.काॅलेजमध्ये तास सुरू असताना मागील बेंचवरून या घडयाळातून टारगट विद्यार्थी आवाज काढत आणि वर्गभर हशा पिकल्यावर शिकवण्यात तल्लीन असलेल्या शिक्षकाचा पारा चढत असे पण हे घड्याळ खिशात दडवले जात असल्याने ते सापडत नसे. वेळेशिवाय घड्याळांचा असाही उपयोग करता येतो, हे विद्यार्थ्यांशिवाय दुसरे कुणालाच उमगणे शक्य नाही.आता मोबाईल आले आणि त्यात घड्याळ व तारीख दिसू लागले,त्यामुळे घड्याळबाबा जरा मागे पडल्यासारखे झालेत पण तरीही घराची भिंत आणि माणसाचा हात याला घड्याळाशिवाय शोभा नाही.गांधीजींचे कमरेचे घड्याळ हेसुद्धा हे वेगळेच घड्याळ होते पण या सा-या पलिकडे जाऊन,'आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक...' या कवितेतले  ते घड्याळ अनादी अनंत काळापासून आजतागायत सुरू आहे आणि ते सुरू राहील.सुर्यदेवाच्या रूपाने ते रोज सकाळी येते आणि सायंकाळी मावळते.पण आजीबाई तरी किती हुशार म्हणाव्यात...रात्री कितीचा प्रहर झाला हे न चुकता त्या सांगू शकतात कारण त्यांना घटका पळे यांची गणिते खूप उत्तम प्रकारे जमतात.त्यामुळेच स्वामी स्वरुपानंद आपल्या अभंगात म्हणतात,' घटका गेली,पळा गेली तास वाजे ठणाणा....आयुष्याचा नाश होतो राम का रे म्हणा ना.... अशा या घड्याळाबाबांना विनम्र अभिवादन करून आपण पुढच्या कामासाठी सज्ज होवू या...


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute