असुनि डोळे आम्ही आंधळे

 

माझ्या खिशात इंदिराजींच्या काँग्रेसचा हात आणि जनता पार्टीचा नांगरधारी शेतकरी असे दोन परस्पर विरोधी पक्षाचे बिल्ले एकत्र नांदत होते. तसे ते मतदान केंद्रावर क्षम्य नव्हते पण ते बिल्ले काढले असते तर मी आणखी जोरात रडलो असतो हे आधीच समजून पोलिसाने त्याला महत्व दिले नाही.

राजकारण आणि निवडणुका याचा उबग आजकाल सामान्यांना  येत असतो हे जरी खरी असले तरी १९८०-९० च्या दशकात निवडणूका कशा असायच्या आणि त्यावेळी काय केले जायचे हे सर्व राजकारण बाजूला ठेऊन जाणून घेण्यास काही हरकत  नसावी असे वाटते. ८० ते ९० च्या दशकातील राजकारण हे वैचारिकतेवर अधिक चालत असे. आपल्या विरोधी पक्षाच्या धोरणावर टीका करून आपली भूमिका पटवून देण्याचा प्रयत्न प्रत्येकजण  करत असत. आजच्यासारखी व्यक्तिगत टीका किंवा कुणाची बदनामी त्याकाळात होत नसे. मुळात निवडणूकांची संख्या तशी मर्यादित आणि प्रचार सभाही मर्यादित होत्या.नाही म्हणायला लाऊडस्पीकरवरून गावात फिरता प्रचार केला जात असे.या घडीला राजकारणाचा जरी तिटकारा वाटत असला तरी बालपणी निवडणूका आल्या की,बरे वाटत असे. त्याला कारण होते ते म्हणजे विविध पक्षांचे बिल्ले आणि पोस्टर्स मिळत असत. तेव्हा आचारसंहिता नावाचा निवडणूक आयोगाचा फार काही नवे निष्पन्न न करणारा कागदी बागुलबुवा नसल्याने रस्त्यावरून चालताना कुठेतरी झाडाला पोस्टर्स लावलेले दिसायचे पण त्यात फारसा जीव न गुंतवता जास्तीत जास्त पक्षांचे बिल्ले कसे हाती लागतील,याकडे माझा कटाक्ष असे.हे बिल्ले कागदी असत आणि आजीने दिलेल्या एका खास लोखंडी पेटीत मी ते जपून ठेवत असे.गावपातळीवर माझ्या वाट्याला तसे काँग्रेस आणि जनता पार्टी व नंतरचे जनता दल हेच काय ते बिल्ले लागत.शिवसेना त्यावेळेस गावात  नव्हती. त्या काळात प्रा. मधु दंडवते,मुसाभाई मोडक,ल.र.हातणकर, जगन्नाथराव जाधव, एम.डी.नाईक अशी मंडळी निवडणुका लढवत असत. प्रत्यक्षात उमेदवाराचे दर्शन फार कमीवेळेस होत असे पण कार्यकर्ते चोख कामगिरी करत असत.नेते निष्ठावान व तत्ववादी असल्याने कार्यकर्तेही तितकेच बुद्धिमान आणि एकनिष्ठ होते. प्रचारादरम्यान विरोधी कार्यकर्ते समोर आलेच तर ऐकमेकांची आजच्यासारखी डोकी न फोडता ऐकमेकांशी हस्तांदोलन करून शुभेच्छा दिल्या जायच्या कारण कोण निवडून येणार हे जनता ठरवणार असल्याने कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यापासून ते कार्यकर्त्यांपर्यत सारे पाय जमिनीवर ठेवून वावरत व असभ्य वर्तन करत नसत.मला बालपणी आजीसोबत मतदान केंद्रावर गेल्याचा प्रसंग आजही आठवतो.आजीला आत पाठवून मला मसुरकर पोलिसाने आवाजात आणता येईल तेवढा गोडवा आणत आणि ड्युटीचा भाग नसतानाही स्वतःजवळ बसवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण आजी दिसत नाही म्हटल्यावर मी भोकाड पसरले आणि त्या पोलीस काकाने,गरजवंताला अक्कल नसते अशा अविर्भावात का असेना पण मला चाॅकलेट दिले.त्यातच माझ्या खिशात इंदिराजींच्या काँग्रेसचा हात आणि जनता पार्टीचा नांगरधारी शेतकरी असे दोन परस्पर विरोधी पक्षाचे बिल्ले एकत्र नांदत होते. तसे ते मतदान केंद्रावर क्षम्य नव्हते पण ते बिल्ले काढले असते तर मी आणखी जोरात रडलो असतो हे आधीच समजून पोलिसाने त्याला महत्व दिले नाही.अशा प्रकारे आजी मतदान करून आली आणि, हा घ्या तुमचा नातू असे म्हणत पोलिसाने सुटलो एकदाचा एवढेच काय ते म्हणायचे बाकी ठेवले होते.मतदानाच्या दिवशी मजा असायची .पण आम्ही लहान असल्याने खिशाला बिल्ला लावण्यास मज्जाव असे पण तरीही बूथ फिरणे हा एक आवडीचा विषय होता.तेथे कांदा घातलेला फरसाण आणि चहा मिळत असे. त्या गणेश ब्रँडच्या २० रुपयात किलोभर मिळणाऱ्या फरसाणाची   चव आठवली की आताही तोंडाला पाणी सुटते. पुर्वी बऱ्याचशा निवडणुका या सुट्टीतच होत व त्यामुळे शाळा नावाचे टेन्शन नसे. निवडणूक आयोगाकडे तेव्हा जो शहाणपणा होता तो आता कसा एकाएकी  लयास गेला कुणास ठाऊक? बदलत्या काळानुसार राजकारण बदलले त्यात पैसा आणि गुंडगिरी तसेच कट्टर धर्मांधता शिरली.बुद्धीमत्तेचे युग मागे जावून ईष्येच्या राजकारणाला सुरूवात झाली.कुटुंबे फुटली आणि पक्षसंख्याही वाढली.त्यातच रोजच्याच सभा,यात्रा आणि गरज नसताना मुठी आवळल्या जावू लागल्याने सर्व प्रकाराने शांतता धोक्यात येण्याची भीती वाढली.आजकालचे राजकारण विषारी आणि कटुता वाढवणारे ठरल्याने त्याचा उबग आला. अशा परिस्थितीत 'असुनि डोळे आम्ही आंधळे' अशी अवस्था होऊन मनातल्या मनात जुन्या आठवणींची उजळणी करण्याची वेळ आली.आता ते बिल्लेही नकोत..खोकेही नकोत आणि बोकेही नकोत असे तोंडातल्या तोंडात पुटपुटत बसायचे.उन्मत्तांसमोर आपण तरी दुसरे काय करणार?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute