भगवंताची पन्नाशी!

 

सचिन तेंडुलकरचे महानपण त्याच्या खेळाइतकेच विनम्रतेतही दडलेले आहे.तसे क्रिकेटमध्ये खूप खेळाडू त्यांच्या सुरेख खेळासाठी प्रसिद्ध होते पण  डाव रंगलेला असताना मध्येच नव्वदीत बाद होणे भलेही तो उतावीळपणाचा का एक भाग असेना पण सचिनला सहानुभुतीच देऊन गेला.पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद ठरवणे आणि सचिनने गुमान निघून जाणे,अशावेळेस चाहते मैदानाबाहेरून त्या पंचाला कडकडून शिव्या देत असत.

समर्पण,जिद्द,कौशल्य आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठीची धडपड,मेहनतीची तयारी असलेला सामान्य कुटुंबातील माणूसही  त्याने निवडलेल्या क्षेत्रात  उच्च स्थानी पोचून  जितीजागती  दंतकथा ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण  म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर.सत्तरीच्या दशकात गरीबी हटावच्या घोषणा देशात दिल्या जात होत्या.त्या काळात जन्मलेले हे बालक गो-या साहेबाच्या क्रिकेटमध्ये त्यांच्याही कितीतरी वरच्यास्थानी पोचेल असे त्यावेळी कुणीच गृहीत धरले नव्हते. क्रिकेटचा भगवंत असलेला सचिन तेंडुलकर आता पन्नाशीचा झाला. त्यानिमित्त त्याच्या कारकिर्दीचे विश्लेषण तीन टप्प्यांत करावे लागेल.बालकांड,मैदानकांड आणि आता सुरू असलेले किचनकांड असे त्याचे टप्पे करावे लागतील.बालपणीचा सचिन हा खोडकर आणि भिंतीवर चेंडू उडवून टेनिसपटू होण्याची स्वप्ने रंगवणारा... पण त्याच्या या स्वप्नात क्रिकेटपटूच्या रूपात रंग भरले ते अजित तेंडुलकर यांनी.पुढे आचरेकरांच्या तालमीत सचिन एकाएकी घडला असे नव्हे तर त्याला क्रिकेटचा ध्यास घेण्यास आचरेकर सरांनी भाग पाडले. फलंदाजीचे धडे देताना सर्व प्रकारचे फटके अचूकपणे खेळता आलेच पाहिजेत,आणि जोपर्यंत हे होत नाही तोपर्यंत सराव आणि फक्त सरावच सुरू रहायचा. वेळप्रसंगी हाताचा शेकही द्यावा लागायचा पण अशीवेळ एकदोनदाच आली असावी नाहीतर शब्दाचा मार पुरेसा ठरत होता आणि मुलगा उत्तम प्रकारे शिकत होता. त्यात त्याच्या काका- काकूचाही मोठा वाटा होताच.पण प्रश्न असा पडायचा की,एका साहित्यिकाच्या घरी ही क्रीडापटूची मुळी कुठून उगवली?असेच एका कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकरचे वडील कविवर्य प्रा. रमेश तेंडुलकर हर्चे गावात आले होते.तेव्हा त्यांना हा प्रश्न केला असता त्यांनी 'भगवंतास ठाऊक',असे म्हटले होते.आज त्यांचा मुलगाच क्रिकेटचा भगवंत झालेला आहे, पण हे पहायला ते मात्र नाहीत. अशा प्रकारे सचिनचे बालपण कधी आदल्या दिवशी धुतलेला शर्ट वाळला नाही म्हणून तो तसाच घालून धावपळ करण्यात, तर कधी हा सर्व संघर्ष कधी संपेल,असा विचार करण्यात निघून गेले.मैदानावरील सचिन तेंडुलकर पहिल्या सामन्यापासून बिनधास्त दिसला.कसोटी असो की वनडे त्याने पहिल्या सामन्यापासून 'दे दणादण' सुरू केले.आजकाल भारतीय संघात पदार्पण करीत असलेला खेळाडू पुढे काय होणार? फ्लाॅप झालो तर संघात ठेवतील का, या भीतीने बिचकत खेळतो.अशावेळेस त्यांनी सचिन तेंडुलकरचा पदार्पणाचा सामना पहायला हवा.त्यावेळेस तो परिपूर्ण नव्हता पण बिनधास्त नक्कीच वाटत होता.सुदैवाने त्याचे संघातील वरीष्ठ खेळाडू उत्तम प्रकारे धीर देत असत कारण सचिन खूप लहान होता. त्याला बळ देण्यात  कपिलदेव हे चार पावले पुढे असत. पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळताना सचिनने चेंडू आणि धावा यांचे जमवलेले गणित,त्याची सामन्याबाबत विचार करण्याची त्यावेळची  शक्ती दाखवून देते. त्याकाळात वेगवान फलंदाजी करणे सोपे नव्हते कारण जवळपास प्रत्येक संघात नावाजलेले गोलंदाज कधी कसा चेंडू टाकतील याचा नेम नसे. मैदानावरील अनुभवातून सचिन पुढच्या गोष्टी शिकत गेला.आक्रमण हाच बचाव हे धोरण ठेवून समोर कोणता संघ आहे आणि कोण गोलंदाजी करतोय याचा विचार त्याने कधी केलेला नसावा आणि त्यामुळेच त्याला हे जमू शकले.पाकिस्तानविरूद्ध तो उतरला तेव्हा त्या संघाचे नेतृत्व इम्रान करत होता.'इस लडके के बारे में बहुत सुना हैं,इसे ज्यादा करने मत देना' असे वकारला त्याने बजावले होते पण तेथेही तो सुरूवातीला बिचकल्यानंतर धावा करू लागला.त्याकाळी विंडीज,पाकिस्तान,आॅस्ट्रेलिया,इंग्लंड असे एकापेक्षा एक मातब्बर संघ आणि त्यांचे दिग्गज खेळाडू होते.गोलंदाज म्हणजे कर्दनकाळच वाटावेत असे होते.त्या तोफखान्याला सचिन पुरून उरला.लारा,सचिन,स्टीव्ह वाॅ,जॅक कॅलिस असे कितीतरी खेळाडू एकमेकाशी श्रेष्ठत्वासाठी तुलना करायला पर्यायी रूपात उपलब्ध असत आणि त्यांचा खेळही तसाच होता.टीव्हीचा  मर्यादित पर्याय आणि आकाशवाणीच्या धावत्या समालोचनच्या युगातून पुढे वाटचाल करणारा सचिन अगदी सामना प्रसारण हक्कांवर बोली लागण्याच्या युगाचा साक्षीदार राहिला.एकदिवसीय,कसोटीप्रमाणेच त्याने टी20मध्येही जलवा दाखवून दिला.सदाबहार फलंदाजी असलेल्या सचिनच्या पदरी शतकांच्या महाशतकाचा योगही आला पण त्याची सर्वात मोठी पोचपावती ठरली ती हीच की,आजच्या क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर असता तर त्याने एक लाख धावा केल्या असत्या...ही कमेंट ...पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचे ते मत आहे. वेंगसरकर,गावसकर यांच्या वेळेच्या क्रिकेटपासून ते कोहलीयुगाच्या बदलत्या क्रिकेटपर्यंत सचिन नुसता खेळला नाही तर बहरलासुद्धा...या दरम्यान चढउतार होतेच.कधी टेनिस एल्बोची दुखापत तर कधी खराब कामगिरीमुळे घरच्या प्रेक्षकांनी उडवलेली हुर्यो,भारतीय संघ हरल्यावर चाहत्यांनी काढलेली प्रेतयात्रा या घटनांकडे पाहताना त्याचा तोल कधी ढळला नाही.सचिन तेंडुलकरचे महानपण त्याच्या खेळाइतकेच विनम्रतेतही दडलेले आहे.तसे क्रिकेटमध्ये खूप खेळाडू त्यांच्या सुरेख खेळासाठी प्रसिद्ध होते पण  डाव रंगलेला असताना मध्येच नव्वदीत बाद होणे भलेही तो उतावीळपणाचा का एक भाग असेना पण सचिनला सहानुभुतीच देऊन गेला.पंचांनी चुकीच्या पद्धतीने बाद ठरवणे आणि सचिनने गुमान निघून जाणे,अशावेळेस चाहते मैदानाबाहेरून त्या पंचाला कडकडून शिव्या देत असत.भारतीय क्रिकेटमध्ये जाहीरातीच्या आणि विविध दौ-यांच्या रूपात खो-याने पैसा आला तो सचिनच्या युगात.बीसीसीआयच्या त्यावेळेस  अध्यक्षस्थानी असलेल्या जगमोहन दालमिया यांनी पुरेपूर वापर करून बीसीसीआयला धनवान केले.खेळ ब्रिटिशांचा आणि त्यावर आर्थिक कब्जा भारतीयांचा हे तेव्हापासून चालत आलेले आर्थिक गणित आजही कायम आहे.सचिनची कोणती खेळी श्रेष्ठ?याचे उत्तर देणे कठीण आहे. प्रत्येक फटका खेळतानाची त्याची छबी इतकी सुरेख की नजरबंद करून ठेवावी. त्यामुळेच त्याच्याविषयी विश्लेषण करताना विश्लेषकही अनेकदा सैरभैर होतात.सचिनच्या  खेळाचे रसभरीत वर्णन रवी शास्त्री,टोनी ग्रेग,जेफ्री बाॅयकाॅट ,बॅरी रिचर्डस यांच्या मुखातून ऐकायला खूप मजा यायची. निवृत्तीनंतरचा सचिन आता भटकंती आणि किचनमध्ये रमतो अलिकडेच संक्रांतीला त्याने गुपचूप तिळगुळ बनवला होता.तर फिरस्तीवर असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या टपरीवर जाऊन चहा व वडापावचा आनंदही लुटला.पक्का खवय्या असलेला सचिन मत्स्याहारी आहे पण अळूचे फतफते त्याला खुप आवडते. हे सर्व होत असतानाच तो कधी पन्नाशीचा झाला ते कळलेसुद्धा नाही.वर्षे पाण्यासारखी निघून जातात आणि आठवणी मागे राहतात.क्रिकेटचा भगवान आता पन्नाशीत पोचल्यावर,'होऊन जावू द्या राव शतक किंवा द्विशतक....जियो हजारो साल ' अशा शुभेच्छा त्याला देऊन आज येथेच थांबूया......


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute