आहे ते झाले थोडे....

गुन्हेगार टोकाचा गुन्हा करतो,पुरावे नष्ट करतो, क्रूरतेची हद्द ओलांडून मोकळा होतो मग अशा गुन्हेगाराला त्याच पद्धतीने तडफडून मरण देणारी सजा दिली गेली तर तो त्याचा अमानुष छळ कसा आणि हे सर्व आताच इतक्या वर्षानंतर घटनाबाह्य वा अमानुष कसे काय वाटू लागले.देशात आजवर स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक कायदेपंडीत,विचारवंत आणि मानवतावादी उदयास आले पण या विषयावर त्यांनी काथ्याकूट केला नाही याचे कारण फाशीची सजा गुन्हेगाराला कोर्ट कधी देते,हे या साऱ्यांना पूर्णपणे ठाऊक होते तसेच अमानुषतेला मिळणारी सजा त्याच पद्धतीची ठेवली म्हणून लोकशाहीची राजेशाही होण्याची सुतराम शक्यता नाही 

गुन्हेगारी कृत्य क्रूरपणा किंवा विकॄतीशिवाय पूर्ण होत नाही.अर्थात प्रत्येक गुन्ह्याचे स्वरूप वेगळे असले तरी हे प्रकार समाजविघातक आहेत हा त्यातला मुळ मुद्दा असून अशी कृत्ये रोखण्यासाठी वचक ठेवणारा कायदा आणि विनाहस्तक्षेप तपास करणाऱ्या प्रभावी यंत्रणा तसेच खटला सुरू झाल्यावर समोर येणारे पुरावे आणि गुन्ह्याच्या स्वरूपानुसार आखून दिलेली शिक्षा वेळेत सुनावणी करून ठोठावली जाणे अपेक्षित असते. अशावेळेस गुन्हेगाराला सजा भोगताना किती वेदना होतील किंवा आणि काय घडेल याचा विचार करून सजेच्या अंमलबजावणीचे स्वरूप ठरवण्यावर वाजवीपेक्षा जास्त काथ्याकूट करण्यात आला तर अशावेळेस त्या गुन्ह्याची झळ ज्यांना पोचलेय त्यांच्यावर नकळतपणे अन्याय होतो हे प्रथम लक्षात घेणे आवश्यक आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात फाशीची सजा कितपत योग्य यावर सुनावणी सुरू असून कोर्टाने सरकारला, फासावर गुन्हेगाराला लटकवताना त्याचा छळ होतो का याचा विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्याबाबत विचारणा केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गुन्हेगाराला फाशीऐवजी अन्य कोणत्या मार्गाने देहांताची सजा दिली जाते हे पाहणे महत्त्वाचे आहे.हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्याबाबत चर्चा करता येणार नसली तरी अन्य पर्याय कोणते असू शकतात, यावर नक्कीच प्रकाश टाकला जाऊ शकतो.
सध्या गुन्हेगाराला फाशीची सजा फर्मावण्यात आल्यानंतर खूप किचकट प्रकिया पार पडत असतात.शिक्षेला आव्हान,त्याचा निकाल आणि त्यानंतर तोच निकाल कायम राहिल्यास राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज आणि ही दीर्घ प्रकिया पार पडल्यानंतर शिक्षेच्या अंमलबजावणीची तारीख तसेच त्यापुर्वी त्याचे प्रात्यक्षिक करणे अशी पद्धत वेळकाढू असून त्यात महत्त्वाचे म्हणजे जल्लादांची उपलब्धता व त्यांचे मानधन हे मुद्दे सुद्धा महत्त्वाचे आहेत. त्यानंतर फाशी दिलेला गुन्हेगार शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर जवळपास अर्ध्या तासाने पूर्णपणे मृत होतो.त्यादरम्यान त्याच्या देहाची तडफड होत राहते आणि हे अमानुष आहे असा एक मतप्रवाह सुरू असून त्यातूनच मग सर्वोच्च न्यायालयात विविध याचिका दाखल झाल्या आहेत, त्यावर सुनावणी सुरू आहे.
अमेरिकेतील काही प्रांतात फाशीची सजा रद्द करण्यात आलेली असून देहांताची सजा अन्य मार्गाने पूर्ण केली जाते.आता हे अन्य पर्याय कोणते हेसुद्धा महत्त्वाचे असून त्यात विद्युत खुर्ची,गोळीबार,विषारी वायू तसेच इंजेक्शन यांचा समावेश आहे.अलिकडच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी, गोळीबार हा राजेशाही राजवटीतील टाईमपास असल्याचे सांगून त्यावर पडदा टाकला तर इंजेक्शनमध्ये कोणते रसायन वापरतात आणि विषारी वायू ही नेमकी काय पद्धत आहे याचा सविस्तर तपशील देण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमता येईल का? असे सरकारला विचारले असून गुन्हेगाराला सजा देताना त्याचा अमानुष छळ होत नाही ना,हे विविध पातळ्यांवर तपासून पाहिले जाणार आहे.
आता या सा-या प्रक्रियेत सामान्यजनास पडणारे प्रश्नही विचारात घेणे महत्त्वाचे आहे.गुन्हेगार टोकाचा गुन्हा करतो,पुरावे नष्ट करतो, क्रूरतेची हद्द ओलांडून मोकळा होतो मग अशा गुन्हेगाराला त्याच पद्धतीने तडफडून मरण देणारी सजा दिली गेली तर तो त्याचा अमानुष छळ कसा आणि हे सर्व आताच इतक्या वर्षानंतर घटनाबाह्य वा अमानुष कसे काय वाटू लागले.देशात आजवर स्वातंत्र्यानंतरच्या काळात अनेक कायदेपंडीत,विचारवंत आणि मानवतावादी उदयास आले पण या विषयावर त्यांनी काथ्याकूट केला नाही याचे कारण फाशीची सजा गुन्हेगाराला कोर्ट कधी देते,हे या साऱ्यांना पूर्णपणे ठाऊक होते तसेच अमानुषतेला मिळणारी सजा त्याच पद्धतीची ठेवली म्हणून लोकशाहीची राजेशाही होण्याची सुतराम शक्यता नाही आणि म्हणून या प्रकरणाकडे गंभीरपणे पाहण्याची गरज असून देशातील वाढती गुन्हेगारी पाहता जालीम कायद्यांची गरज असून त्यात कुचराई झाल्यास 'आहे ते झाले थोडे...' असे म्हणण्याची वेळ येऊ शकते हे ध्यानी असावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute