फडतूस म्हणाले काडतुसला!


कोण्या एका जमान्यात पुस्तके, पेन, फाईल्स वैगेरे घेऊन राजकीय नेते दिसायचे. नाही म्हणायला, शरद पवार यांच्याकडे या वयातही हे सर्व दिसते पण बाकी या जमान्यातील मंत्रीमहोदय किंवा नेते यांच्याकडे असे काही दिसत नाही. इतकी सर्व माहिती डोक्यात ठेवण्याइतपत ते हुशार आहेत की कसे ते माहित नाही पण जमाना बदलला आहे एवढे नक्की. आता त्यात आणखी पुढे जाऊन कुणाच्या हाती काडतुस दिसू लागले तर? आणि ते फडतुस म्हणून आणखी कुणाच्या हाती बॉम्ब दिसू लागला तर?... कदाचित ही कल्पना येथे मुर्खपणाची वाटेलही पण ही कल्पनाशक्ती घेऊन एक सुरेख विनोदी नाटक मराठी रंगमंचावर येण्यास हरकत नाही
.

राज्यात कडाक्याचा उन्हाळा सुरु झाला असतानाच राजकीय वातावरण तापले नाही तर नवलच. तसे पाहिले तर राज्यातील राजकीय नेत्यांइतकी सविस्तरपणे बोलण्यासाठीची उसंत इतर कुणाच्याच नशीबी नसेल.त्यामुळे त्यांना रोज काहीतरी नवनवीन सुचत असते. कधी कुणी पक्षी वा प्राण्यांचे आवाज काढतो तर कधी कुणी कुणाच्या नकला करतो, कधी कुणी कुणावर आरोप करतो आणि इतके करूनही पोट भरत नाही म्हणून कुणी कुणाला शिव्या देतो व त्याहीपुढे जावून आता जबाबदार नेतेमंडळी फडतूस आणि काडतुसच्या लोभात पडले आहेत. तसे राज्याचे काय किंवा देशाचे, सध्याचे राजकारणच फडतूस झाल्याने कोणत्याही पक्षाच्या नेत्याकडून सुज्ञपणाची अपेक्षा करणे म्हणजे असाध्य गोष्ट स्वप्नात पाहून समाधान मानण्यासारखे आहे. त्यातच या नेते मंडळींच्या तालावर नाचून उठसूट सभा आणि आंदोलनात सहभागी होण्याइतपत प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी कसे? जेणेकरून व्यक्तीगत अर्थार्जनाचा मार्ग सोडून वेळात वेळ काढून हाक मारली की हजर होऊ शकतात, हा एक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात संशोधन करण्यासाठी ठेवण्यालायक विषय आहे. कारण सभा, मोर्चे यांची घोषणा आयत्यावेळी करायची आणि ते पार पाडण्यासाठी तुफानी गर्दी जमवायची हे काही खाण्याचे काम नाही. बरे या नेतेमंडळींना आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची किंवा पदाधिकाऱ्यांची काळजी कितपत, हा आणखी एक संशोधनाचा विषय. आपल्या नेत्याची मर्जी संभाळण्यासाठी कुणी तिखट विधाने, तोडफोड वैगेरे करतो तर कुणी कायद्याच्या लचांडात अडकतो आणि हे कमी म्हणून की काय, सततच्या धावपळीमुळे एखाद्या कार्यकर्त्याचा जीवही जाऊ शकतो. अशा दगावलेल्या कार्यकर्त्याप्रती त्या त्या पक्षाकडून संवेदना व्यक्त केली जातेही पण त्या कार्यकर्त्याचे कुटुंब ती व्यक्ती कायमची गमावते आणि ही पोकळी भरून येणे अशक्य, हे अशा व्यक्तीच्या घरात जन्म घेतल्याशिवाय कुणालाच कळणारे नाही. तशी दुर्दैवी वेळ कुणावरही येऊ नये अशी प्रामाणिक अपेक्षा!
बरे या नेत्यांच्या सभांसाठी किंवा आंदोलनात जावे तर नवीन काही घडण्याची शक्यता नाही. एकाने आरोप करायचे, दुसऱ्याने त्यावर प्रत्युत्तर द्यायचे आणि मूळ विषय भरकटवून टाकायचा हा या साऱ्यांच्या खास आवडीचा छंद. त्यामुळे ऐकमेकांचा उद्धार करण्यापेक्षा दुसरे काही होईल हे गृहीत धरणाराच त्यात मूर्ख ठरण्याची भीती असते. पुर्वी मधल्या फळीचे कार्यकर्ते काहीबाही बेताल विधाने करायचे, त्यात प्रवक्ते मंडळी चार पावले पुढे असायची पण आता तसे राहिले नाही. विविध आंदोलने, सभा किंवा तेही नसेल तर रस्त्याच्या कडेला जेथे जागा मिळेल तेथे वृत्तवाहिन्यांवर चमकण्यासाठी जेव्हा तगडे नेते वेळात वेळ काढून अवतरतात तेव्हा आपली पत, पदानुसार अपेक्षित विद्वता, संयम हे खुंटीला टांगतात आणि सामान्य पुढाऱ्याच्या तोंडची भाषा बोलू लागतात. फडतूस आणि काडतुस हे शब्द यातूनच पुढे आलेले आहेत. तसे या दोन शब्दांचे अर्थ भिन्न आहेत हे महाराष्ट्रातील सुजाण मराठी भाषावीर जाणतात पण एक बोलला म्हटल्यावर दुसऱ्याने यमक करून त्याला उत्तर दिले पाहिजे ही आपली राजकीय रीत बनल्याने कोण कोणत्या शब्दावर काय कोटी करेल काही सांगता येत नाही.
राजकीय पक्षांनी सभा घ्याव्यात, आपआपल्या पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोचवावेत, आंदोलने करावीत, ऐकमेकांना जाब विचारावा, त्याबद्दल कुणाचा पोटशूळ उठण्याचे कारण नाही पण आपल्या भाषेमुळे आपल्या राज्याच्या राजकारणावर फडतूस शेरा कुणी मारणार नाही आणि अनेक महापुरुष व विचारवंतांचे राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्राची पत घसरणार नाही याची खबरदारी प्रत्येक पक्षाच्या नेत्याने घेतली पाहिजे अशी एक अपेक्षा. मात्र ही राजकीय मंडळी सध्या इतकी उथळ विचारांची झालेली आहे की, आपण नेमके काय बोलतो, याचे भानच त्यांना उरत नाही. एकाने टोमणा मारला की, तोच धागा पकडून लागलीच दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या पक्षाचा नेता त्यावर कोटी करण्यासाठी हजर.जर ऐकमेकांकडे दुर्लक्ष करायचे ठरवले तर कदाचित हे थांबू शकेल. नाही म्हणायला काहीतरी राजकीय बातमी हवीच म्हणून भुकेलेला एखादा पत्रकार प्रतिक्रिया विचारेलही पण त्यावर, वेळ नाही असे उत्तर देण्याचे तारतम्य बाळगले तर बरेच काही साध्य होईल पण असा विवेक बाळगण्याची सध्या सोय उरलेली नाही.
काडतुस आणि फडतूस हे तसे पुर्वाश्रमीचे राजकीय पटलावरील समानार्थी शब्द... वास्तविक मराठी भाषेत त्यांचा शब्दशः अर्थ निराळा असेलही पण कालपरवापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात त्याचा समानार्थी अर्थ होता. पण आता राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार, हे काडतुस आणि फडतुस सध्या परस्पर विरोधी शब्द म्हणून उभे ठाकले आहेत. मराठी भाषेला इंग्रजीप्रमाणे एकाच शब्दाचे अनेक अर्थ असलेली संस्कृती मोठ्या जोमाने बहाल करण्याचे काम न चुकता राजकीय मंडळी या मार्गाने जर करत असतील तर त्यांचे मनापासून अभिनंदन करण्याची तयारी मराठीजनांनी ठेवायला हवी. पुर्वी साहित्यिक नवनवीन वाक्प्रचारांची वा शब्दांची भर भाषेत टाकत असत. आता तसे दर्जेदार साहित्यिक उरलेले नाहीत तसेच वाचनाचा जमाना कमी आणि ऐकण्या व बघण्याचा जमाना वाढला व यात जास्तीत जास्त वावर करणारी मंडळी राजकीय क्षेत्रातील आहेत, हा मोठा विलक्षण योगायोग.
कोण्या एका जमान्यात पुस्तके, पेन, फाईल्स वैगेरे घेऊन राजकीय नेते दिसायचे. नाही म्हणायला, शरद पवार यांच्याकडे या वयातही हे सर्व दिसते पण बाकी या जमान्यातील मंत्रीमहोदय किंवा नेते यांच्याकडे असे काही दिसत नाही. इतकी सर्व माहिती डोक्यात ठेवण्याइतपत ते हुशार आहेत की कसे ते माहित नाही पण जमाना बदलला आहे एवढे नक्की. आता त्यात आणखी पुढे जाऊन कुणाच्या हाती काडतुस दिसू लागले तर? आणि ते फडतुस म्हणून आणखी कुणाच्या हाती बॉम्ब दिसू लागला तर?... कदाचित ही कल्पना येथे मुर्खपणाची वाटेलही पण ही कल्पनाशक्ती घेऊन एक सुरेख विनोदी नाटक मराठी रंगमंचावर येण्यास हरकत नाही. त्याची स्टोरी तयार होण्यापुर्वीच फडतुस म्हणाले काडतुसला! असे नामकरणही करता येईल. यथावकाश राजकीय मंडळींनाच घेऊन त्याचा पडदा वर करण्याचा मुहुर्त शोधावा लागेल आणि राज्यातील नाट्य लेखकांना हे जमले नाहीच तर मग राजकीय मंडळीनाच पुढे सरसावून असे नाटक सत्यात उतरवून दाखवावे लागेल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

न्यायामागील अन्याय!

Blog on girls dispute